चक्क शिपायाने तपासले विद्यापीठाच्या परीक्षेचे पेपर, पाच हजार रुपयेही कमावले, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:33 IST2025-04-08T15:31:19+5:302025-04-08T15:33:48+5:30
Madhya Pradesh News: एका महाविद्यालयाच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका चक्क शिपायाने तपासल्याचेसमोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात या शिपायाला उत्तर पत्रिका तपासण्याचं काम सोपवण्यात आलं होतं.

चक्क शिपायाने तपासले विद्यापीठाच्या परीक्षेचे पेपर, पाच हजार रुपयेही कमावले, त्यानंतर...
एका महाविद्यालयाच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका चक्क शिपायाने तपासल्याचेसमोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात या शिपायाला उत्तर पत्रिका तपासण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करत तपासाचे आदेश दिले आहेत. तसेच यासाठी जबाबदार प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मध्य प्रदेशमधील नर्मदापुरम जिल्ह्यातील पिपरिया शहीद भगत सिंग शासकीय पदव्युत्तर महाविद्यालयामध्ये हंगामी प्राध्यापक म्हणून काम करत असलेल्या खुशबू पगारे यांच्याकडे उत्तर पत्रिका तपासणीचं काम सोपवण्यात आलं होतं. त्याचदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये महाविद्यालयातील शिपाई पन्नालाल पठारिया उत्तर पत्रिका तपासताना दिसत आहे. जेव्हा हे प्रकरण उच्च शिक्षण विभागाकडे गेलं, तेव्हा त्वरित तपासणी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अहवालामधूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या अहवालामधून शिपाई पन्नालाल पठारिया याने खुशबू पगारे यांच्याकडील उत्तप पत्रिकांची तपासणी केली होती, असे समोर आले आहे. तसेच पन्नालाल याने पाच हजार रुपये घेऊन उत्तर पत्रिका तपासल्याचे मान्य केले आहे. तर खुशबू पगारे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले की, माझी तब्येत बिघडली होती. त्यामुळे मी कॉलेजचे बुक लिफ्टर राकेश मेहर याला पाच हजार रुपये देऊन अन्य कुणाकडून तरी उत्तर पत्रिकांचं मूल्यांकन करण्यास सांगितलं होतं.
या संपूर्ण प्रकरणात उत्तरदायित्व निश्चित करताना कॉलेजचे प्रभारी प्राचार्य राकेश कुमार वर्मा आणि प्राध्यापक रामगुलाम पटेल यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उत्तर पत्रिका तपासणारा शिपाई पन्नालाल पठारिया आणि हंगामी प्राध्यापिका खुशबू पगारे यांच्याविरोधात विभागीय कारवाईचे आदेश दिले आहेत.