Bihar News: बिहारच्या पाटणा येथील नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातून एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. एखादा व्यक्ती उपचार घेण्यासाठी रुग्णालयात जातो, तेव्हा तो स्वच्छतेची अपेक्षा करतो, परंतु नालंदा रुग्णालयात या उलट घडले आहे. हाडांच्या आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाच्या पायाची चार बोटे चक्क उंदरांनी कुरडली. या प्रकरणाबाबत राजद नेते तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट केली आहे.
ही बाब समजताच रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये गोंधळ उडाला आणि त्यांनी रुग्णालयातील वॉर्ड प्रभारींकडे याबद्दल तक्रार केली. वॉर्ड प्रभारींनी याची दखल घेतली आणि पायाच्या बोटांवर उपचार केले. या प्रकरणाबाबत रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. ओम प्रकाश यांनीही मान्य केले की, पाटण्याच्या नालंदा मेडिकल कॉलेज रुग्णालयात उंदरांची संख्या वाढली आहे. त्यांनी सांगितले की, यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र लिहून उंदरांना पकडण्यासाठी जाळे लावण्याची सूचना केली आहे. यासोबतच त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.
तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला मुद्दा या प्रकरणाबाबत तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट करून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नालंदा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल असलेल्या एका अपंग रुग्णाला रात्री गाढ झोपेत असताना उंदराने त्याच्या पायाची बोटे चावली. या रुग्णालयात अलिकडेच एका मृत व्यक्तीच्या डोळ्याला उंदीर चावला होता, पण आतापर्यंत कोणावरही कारवाई झालेली नाही, असे ते म्हणाले.