पैशांअभावी गर्भवतीला रुग्णालयाबाहेर हाकलले; दरवाजाजवळच प्रसूती, थंडीने बाळाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:10 IST2024-01-01T13:09:20+5:302024-01-01T13:10:28+5:30
प्रचंड थंडी आणि उपचाराअभावी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पैशांअभावी गर्भवतीला रुग्णालयाबाहेर हाकलले; दरवाजाजवळच प्रसूती, थंडीने बाळाचा मृत्यू
बदायूँ (उत्तर प्रदेश) : येथील जिल्हा महिला रुग्णालयात शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने गर्भवती महिलेला बाहेर हाकलून देण्यात आले, त्यानंतर महिलेची रुग्णालयाच्या दरवाजाजवळच प्रसूती झाली. प्रचंड थंडी आणि उपचाराअभावी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
बदायूँचे जिल्हाधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले की, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. कर्मचाऱ्यांनी महिलेशी गैरवर्तन केले. या प्रकरणाची तीन दिवसांत चौकशी होईल.
नेमके काय झाले?
बदायूँ शहरातील रवी पत्नी नीलम यांना प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते.
कर्मचाऱ्यांनी तपासाच्या नावाखाली ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर कर्मचाऱ्यांनी नीलमला ढकलून दिले.
हताश झालेले रवी नीलमला रुग्णालयाच्या दरवाजाजवळ घेऊन गेले; परंतु वेदना वाढून तिथेच त्यांनी मुलाला जन्म दिला. अति थंडी आणि उपचाराअभावी रुग्णालयाच्या गेटवरच मुलाचा मृत्यू झाला.