इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास अजूनही सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात एक विचित्र घटना घडली आहे. राजा रघुवंशीच्या इंदूरमधील घरी अचानक एक व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात पोहोचला. त्याने राजाच्या कुटुंबीयांशी चौकशी सुरू केली. त्याच्या बोलण्यावर राजाच्या कुटुंबीयांना संशय आला, म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन याची माहिती दिली. तेव्हा कळले की, तो व्यक्ती आरपीएफचा (रेल्वे पोलीस दल) हेड कॉन्स्टेबल असून त्याला सेवेतून बडतर्फ (बर्खास्त) करण्यात आले आहे. तो कोणत्या उद्देशाने राजाच्या घरी आला, याचा तपास सुरू आहे.
राजा रघुवंशीचा भाऊ विपिन रघुवंशी याने सांगितले की, एक पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी आला आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी विचारू लागला. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर संशय आला. आम्ही या घटनेची तक्रार राजेंद्र नगर पोलिसांकडे केली.
राजेंद्र नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज बिरथरे यांनी सांगितले की, "पकडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव भजनलाल आहे. तो मूळचा राजस्थानचा असून आरपीएफमध्ये हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. परंतु, त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आल्यामुळे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी त्याला बडतर्फ केले होते."
आरपीएफमधून बडतर्फ झाल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. तेव्हापासून तो आरपीएफच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारींचा गणवेश घालून फिरत असतो. सध्या या संपूर्ण प्रकरणाची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. तसेच, त्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हाही दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
'राजा माझा मित्र होता'
पोलीस चौकशीत आरपीएफमधून बडतर्फ झालेल्या हेड कॉन्स्टेबल भजनलालने सांगितले की, "राजा रघुवंशी माझा मित्र होता. मी त्याला यापूर्वीही अनेक वेळा भेटलो होतो. पण राजाची हत्या झाल्यावर काही कारणांमुळे मला त्याच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी पोहोचता आले नाही. आज मी उज्जैनमध्ये दर्शन घेतल्यानंतर राजा रघुवंशीच्या घरी आलो होतो. मी फक्त राजाच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन देण्यासाठी आलो होतो."
पोलीस करत आहेत चौकशी
राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांना त्याच्यावर संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, "आम्ही त्याची चौकशी करत आहोत की राजाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्याने हाच मार्ग का निवडला. तो सामान्य व्यक्ती म्हणूनही त्यांना भेटू शकला असता."