हिमाचलमध्ये नवा डाव? विक्रमादित्य दिल्लीत काँग्रेसला भेटणार की भाजपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 07:14 IST2024-03-02T07:14:36+5:302024-03-02T07:14:53+5:30
काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांची बैठक सुरू असताना विक्रमादित्य हरयाणाला निघून गेले. आज पंचकुलात त्यांनी अपात्र ठरविण्यात आलेल्या बंडखोर आमदारांची भेट घेतली.

हिमाचलमध्ये नवा डाव? विक्रमादित्य दिल्लीत काँग्रेसला भेटणार की भाजपला
मंडी : हिमाचल प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत कलह अजूनही शमलेला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले विक्रमादित्य सिंह पंचकुलात बंडखोर आमदारांची भेट घेतल्यानंतर दिल्लीला रवाना झाले असून, या दौऱ्यात ते काँग्रेसच्या नेतृत्वाची भेट घेतात की, भाजपच्या यावर तर्कवितर्क सुरू आहेत. कारण, यावरून राज्याचे पुढील राजकारण ठरणार आहे.
काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांची बैठक सुरू असताना विक्रमादित्य हरयाणाला निघून गेले. आज पंचकुलात त्यांनी अपात्र ठरविण्यात आलेल्या बंडखोर आमदारांची भेट घेतली.
सस्पेन्स कायम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांनी विक्रमादित्य काँग्रेस नेतृत्वाची भेट घेणार असल्याचे सांगितले. एवढेच नाहीतर त्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यताही फेटाळली. मात्र, भाजपच्या सूत्रांनी विक्रमादित्य भाजप श्रेष्ठींना भेटणार असल्याचे सांगितले.
सर्वकाही आलबेल नाही
काँग्रेस नेत्यांनी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करण्याऐवजी पक्षनेतृत्वाशी बोलावे, अशा सक्त सूचना हायकमांडने दिल्या होत्या. याउपरही काँग्रेस नेत्यांच्या टीकाटिप्पणी सुरूच आहेत. प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह यांनी पुन्हा एकदा जाहीरपणे सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.