लग्नात विघ्न अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे झालेल्या एका विवाह सोहळ्यादरम्यान उपस्थितांना आला. येथे लग्न समारंभ सुरू असतानाच लग्नाच्या हॉलमध्ये अचानक बिबट्या घुसल्याने एकच गोंधळ उडाला. नटून थटून लग्नासाठी तयार असलेली वधू मेत्रिणींसह हॉलमधून बाहेर पडली. तर वरानेही हॉलच्या खिडकीतून उडी मारून जीव वाचवला. वऱ्हाडी मंडळींनीही जीव मुठीत धरून हॉलमधून काढता पाय घेतला. चवताळलेल्या बिबट्याने पकडण्यासाठी आलेल्या एका वन अधिकाऱ्यालाही जखमी केले. अखेर रात्रभर चाललेल्या मोहिमेनंतर आज पहाटे ४ च्या सुमारास या बिबट्याला पकडण्यात यश आले.
ही घटना लखनौमध्ली पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमएम मॅरेज लॉनमध्ये घडली. येथे बुधवारी रात्री एक लग्नसोहळा सुरू होता. तेव्हा रात्री १०.३० च्या सुमारास एका पाहुण्याने दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बिबट्याला पाहिले आणि खाली उडी मारली. त्यात तो जखमी झाला. तर बिबट्या आल्याचं समजताच लग्न सोहळ्यात गोंधळ उडाला.
दरम्यान, जखणी वनअधिकाऱ्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भागात मागच्या काही आठवड्यांमध्ये अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.