बालाजी देवर्जनकर, मुख्य उपसंपादक
रतीय नेल्लोर जातीची ‘व्हिएटिना-१९’ ही गाय. वजन १ हजार १०१ किलो. इतर जातीच्या गायींच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट वजनाची. ४.८ दशलक्ष डॉलर्समध्ये ही विकली गेली. आतापर्यंत विकली जाणारी सर्वांत महागडी गाय म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये ‘ओंगोल’ची नोंद झाली आहे. पण, प्रत्येक भारतीय गाय ४० कोटींची होईल, यासाठी भारतात कधी प्रयत्न होतील? संशोधन, संवर्धनातून असा सन्मान आपण कधी मिळवू, हा प्रश्न उपस्थित होतोच.
जगातील दूध उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक गेल्या २५ वर्षांपासून नावाजला जातोय. भारतीय गोवंशाची गुणात्मक आणि प्रजननात्मक वैशिष्ट्ये जेवढी विदेशी संशोधकांना आणि उत्पादकांना कळली, त्यामानाने देशात तंत्रज्ञानाअभावी अशी सगळी वैशिष्ट्ये केवळ १० टक्केच भारतीयांना समजली. गिरोलांडो या गीर जातीपासून विकसित केलेल्या गायीच्या बाबतीत जगातही सात-आठ वर्षांपूर्वी असाच गौरव झाला.
आनुवंशिकता, प्रजननक्षमता व उत्पादकता
या अंगीकृत गुणांबाबत संशोधन आणि विकासातून सातत्य साधताना भारतीय वंशावळच्या गोवंशाचे स्थान सर्वांत अग्रेसर आहे. ‘ओंगोल’ ही शरीराची कार्यक्षमता आणि दूध उत्पादन या दोन्हीसाठी वर्षानुवर्षे नावाजली गेली आहे. भारतीय वंशावळीच्या अनेक गोवंशाची जैविक किंमत मोठ्या प्रमाणात कळल्यामुळे चांगला भारतीय गोवंश परदेशाने गेल्या ५० वर्षांत खरेदी केला आहे.
भारतीय गोवंशाच्या सर्वच जाती कशामुळे श्रेष्ठ?
आधुनिक काळातील जगाची आव्हाने तापमानवाढ, पर्यावरण ऱ्हास, नैसर्गिक असमतोल, लागवडीखालील जमीन क्षेत्रात घट अशी असताना तग धरण्याची क्षमता या एकाच निकषावर भारतीय गोवंशाच्या सर्वच जाती श्रेष्ठ ठरतात.
परजीवी प्रादुर्भावावर यशस्वी मात, प्रतिकूल वातावरणात जगण्याची क्षमता, संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी सक्षम रोगप्रतिकारक क्षमता, निकृष्ट शेतीसाठी टणक खुरांची उपयुक्तता याबाबत असणारा अद्वितीय वेगळेपणा भारतीय वंशाची किंमत कैक
पटीने वाढवतो.
दरवर्षी नियमित, मात्र अपेक्षित सरासरी गोवंश दूधवाढ जगभर करण्यात आली आणि होलस्टन फ्रेशियनसाठी अशी वाढ दीड-दोन लिटरपासून दीडशे लिटरपर्यंत झाली, याला दीडशे वर्षांचे सातत्य, पाठपुरावा, अभ्यास, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे.
‘चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड’ स्पर्धेत ‘मिस साउथ अमेरिका’
मूळतः आंध्र प्रदेशच्या ओंगोल प्रदेशातून आलेली ही जात कठीण हवामान सहन करण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. ही जात भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणात आढळते. ओंगोल तिच्या अद्वितीय आनुवंशिक गुणधर्मांमुळे आणि शारीरिक वैशिष्ट्यांमुळे जगभर ओळखली जाते. तिने प्रतिष्ठित ‘चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड’ स्पर्धेत ‘मिस साउथ अमेरिका’ हा सन्मानही मिळविला आहे.
तिची वासरे भ्रूण स्वरूपात जगभर निर्यात होतात. दूध उत्पादनात आघाडीवर असलेल्या गीर, थारपारकर, सहिवाल, रेड सिंधी, कांकरेज या टॉप फाइव्ह जातींसह पुढच्या टप्प्यात गिरोलांडो, व्हिएटिना, ओंगल या गायींच्या जातीही अधिक दूध देणाऱ्या आहेत. ओंगोलने त्यात आघाडी मिळवून हॅटट्रिक साधली आहे.
जनुकीय अभियांत्रिकी हा अतिशय प्रगत विषय गोठ्यापर्यंत जात नाही म्हणून भारतीय गोवंशाच्या विकासासाठी परदेशातच अधिक प्रयत्न होताना दिसतात. सक्षम पैदास धोरण आणि त्याची कटाक्षाने अंमलबजावणी करणाऱ्या ब्राझीलला भारतीय गोवंशाच्या गायीच्या संवर्धनातून सन्मान प्राप्त करता आला, त्याचे मूळ ज्या दिवशी भारतीयांना कळेल त्या दिवशी देशातील प्रत्येक गाय ४० कोटी किमतीची होईल.
डॉ. नितीन मार्कंडेय, सदस्य, महाराष्ट्र गोसेवा आयोग