पेट्रोलच्या रांगेत बस घुसून जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 07:18 AM2024-01-04T07:18:16+5:302024-01-04T07:18:37+5:30

गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.

A boy who was injured after a bus rammed into a petrol queue died | पेट्रोलच्या रांगेत बस घुसून जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू

पेट्रोलच्या रांगेत बस घुसून जखमी झालेल्या मुलाचा मृत्यू

पालघर : वाहतूकदारांच्या संपामुळे पंपावर लागलेल्या वाहनांच्या रांगेत  मंगळवारी भरधाव एसटी घुसल्याने झालेल्या अपघातात पूरब राजभोर हा पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी त्याचा मृत्यू झाला. 

 गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अपघाताला जबाबदार एसटी चालक विजय चिखराम (वय ३५, यवतमाळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील हजारो ट्रक व्यावसायिकांनी एकत्रित येऊन नव्या हिट ॲण्ड रन कायद्याला विरोध करीत मंगळवारी निदर्शने सुरू केल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

इंधनाचे टँकर पोहोचत नसल्याने पालघरमधील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचे फलक झळकले  होते. त्यामुळे पालघर-बोईसर या मुख्य रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर सकाळी सात वाजल्यापासून लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी या रांगांमुळे दोन्ही बाजूने वाहनांची गर्दी वाढू लागल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते.

याच वेळी पालघरवरून बोईसरकडे जाणाऱ्या एका भरधाव एसटीने गर्दीत उभ्या असलेल्या एका टेम्पोला जोरदार धडक दिली. या धडकेत टेम्पोजवळ असलेला पूरब  हा गंभीर जखमी झाला. त्याला पालघरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. 

गंभीर जखमी झालेल्या पूरब राजभोर (वय ५) यास पुढील  उपचारासाठी वलसाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज बुधवारी सकाळी थांबली. 
 

 

Web Title: A boy who was injured after a bus rammed into a petrol queue died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.