९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:11 IST2025-06-03T12:09:16+5:302025-06-03T12:11:34+5:30

Vande Bharat Train Jammu Kashmir: एप्रिल महिन्यातच पंतप्रधान मोदी या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करणार होते. परंतु, अचानक कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

943 bridges 36 tunnels vande bharat will run in kashmir after 30 years 6 hour journey possible in 3 hours know about route and time table | ९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!

९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!

Vande Bharat Train Jammu Kashmir: अल्पावधीतच लोकप्रिय झालेली भारतीय रेल्वेची सर्वांत प्रिमियम ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस. संपूर्ण देशातील विविध मार्गांवर वंदे भारत ट्रेनची यशस्वी धाव सुरू आहे. परंतु, काश्मीरमध्ये अद्यापपर्यंत वंदे भारत ट्रेन सुरू झालेली नव्हती. एप्रिलमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी कटरा ते श्रीनगर या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करणार होते. परंतु, तो कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला होता. आता ६ जून २०२५ रोजी पंतप्रधान मोदी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात, असा कयास बांधला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर आणि कटरा दरम्यान रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे काश्मीर रेल्वेने जोडले जाईल. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगरमधील प्रवासाचा वेळ बराच कमी होईल. काश्मीर खोऱ्यातील रेल्वे सेवा फक्त बारामुल्ला ते सांगलदान या मार्गादरम्यान मर्यादित आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस कटरा ते श्रीनगर आणि बारामुल्लापर्यंत थेट जाईल. अद्यापपर्यंत या मार्गावर कोणतीही थेट ट्रेन नव्हती. पूर्वी रस्त्याने हा प्रवास करण्यासाठी ६ ते ७ तास लागायचे. आता वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हा प्रवास ३ तासांत पूर्ण करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

कोणती स्थानके घेणार? वेळापत्रक काय असणार?

ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावेल. ती कटरा येथून सकाळी ८.१० वाजता सुटेल आणि श्रीनगरला सकाळी ११.२० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात हीच वंदे भारत ट्रेन श्रीनगरहून दुपारी १२.४५ वाजता निघेल आणि कटरा येथे दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवरून वंदे भारत ट्रेन धावेल. रियासी, सांगलदान, बनिहाल, काजीगुंड, अनंतनाग आणि अवंतीपोरा या स्थानकांवर थांबेल. यामुळे या ठिकाणी प्रवास करणे सोपे होईल. वंदे भारत एक्स्प्रेस चिनाब पुलावरून जाईल. त्यामुळे या प्रवासाचे हेही एक प्रमुख आकर्षण मानले जात आहे. 

दरम्यान, कटरा ते श्रीनगर या मार्गाचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी असू शकतो, असे म्हटले जात आहे. या मार्गावर ३६ बोगदे आहेत. रेल्वे मार्गावर ९४३ पूल आहेत. १६४ किमीचा प्रवास बोगदे आणि पुलांमधून केला जाईल. कटरा-रियासी या मार्गावर देशातील पहिला रेल्वे केबल स्टे ब्रिज बांधण्यात आला आहे. भूकंप, वादळ किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास, त्याच्या नियंत्रण कक्षाकडून तात्काळ अलर्ट जारी केला जाईल. गरज पडल्यास, ट्रेन मध्येच थांबवता येणे शक्य होणार आहे. रामबन जिल्ह्यातील खारी - सुंबड मार्गादरम्यान देशातील सर्वांत लांब १२.७७ किमी लांबीचा बोगदा आहे.

 

Web Title: 943 bridges 36 tunnels vande bharat will run in kashmir after 30 years 6 hour journey possible in 3 hours know about route and time table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.