८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 12:07 IST2025-12-13T12:06:42+5:302025-12-13T12:07:39+5:30
SIR in West Bengal: सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणामधून (एसआयआर) धक्कादायक माहिती समोर येत आहे. २००२ च्या मतदार यादीच्या तपासणीमधून अशी काही माहिती समोर आली आहे की, ज्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणामधून (एसआयआर) धक्कादायक माहिती समोर येत आहे. २००२ च्या मतदार यादीच्या तपासणीमधून अशी काही माहिती समोर आली आहे की, ज्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
निवडणूक आयोगाने केलेल्या अंतर्गत विश्लेषणामधून मतदारांच्या आई-वडील, आजोबा यांच्याशी संबंधित कौटुंबिक विवरणामध्ये मोठ्या प्राणावर दोष आढळून आले आहेत. ही माहिती केवळ तांत्रिक फेरफाराकडेच इशारा करत नाही तर मोठ्या प्रमाणावर चुकीच्या नोंदी झाल्याच्या शंकेलाही वाव देत आहे.
एसआयआर अंतर्गत करण्यात आलेल्या तपासामध्ये राज्यातील २००२ च्या मतदार यादीमध्ये सुमारे ८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावांमध्ये दोष दिसून आला आहे. या मतदारांची नावं चुकीची असणं, अपूर्ण असणं किंवा कौटुंबिक नातेसंबंधांची माहिती न जुळणं, अशा त्रुटींचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मते एवढ्या मोठ्या संख्येने राहिलेल्या त्रुटी ह्या टंकलेखनातील चुकांमुळे पुढील समस्यांकडे अंगुलीनिर्देश करतात.
यामधील धक्कादायक बाब म्हणजे सुमारे १३.५ लाख मतदारांच्या रेकॉर्डमध्ये एकाच व्यक्तीचं नाव वडील आणि आईच्या नावांच्या रकान्यामध्ये नोंदवलेलं आहे. म्हणजेच एकाच कुटुंबातील एका सदस्यासाठी जे नाव वडिल म्हणून नोंदवलेलं आहे. तेच नाव दुसऱ्या सदस्यासाठी आई म्हणून नोंदवलेलं आहे. त्यामुळे ही चूक डेटा मायग्रेशनदरम्यान, झालेल्या गोंधळामुळे झाली आहे की जाणीवपूर्वक केलेली चुकीची नोंद आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, या एसआयआरमध्ये ११ लाख ९५ हजार २३० अशी प्रकरणं समोर आली आहेत ज्यामध्ये वडिलांचं वय हे मुलांच्या वयापेक्षा १५ वर्षे किंवा त्यापेक्षा थोडं कमी जास्त नोंदवलेलं आहे. जैविक आणि सामाजिक दृष्ट्या ही बाब जवळपास अशक्य दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणावर वयासंबंधीची विसंगती ही मतदार यादीच्या निर्मिती आणि अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमधील गंभीर दोष उघड करते.
याशिवाय सुमारे २४ लाख २१ हजार १३३ प्रकरणांमध्ये एका व्यक्तीचे सहा किंवा त्यापेक्षा अधिक मुले असल्याने निदर्शनास आले आहे. मात्र यामध्ये काही अपवाद असू शकतात. मात्र लाखोंच्या संख्येने असलेल्या अशा नोंदींबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबरोबरच ३ लाख २९ हजार १५२ मतदारांच्या नोंदींमध्ये आजोबांचं वय हे नातवांच्या वयाच्या तुलनेत ४० वर्षांच्या आसपास असल्याचंही दिसून आलं आहे. ही बाब सुद्धा आश्चर्यजनक मानली जात आहे. तसेच मतदार यादीतील गंभीर दोषांकडे इशारा करत आहे.