ईशान्येतील हिंसाचारापैकी ७७% घटना मणिपूरमध्ये; २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये घटना वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:46 IST2025-01-01T10:45:06+5:302025-01-01T10:46:31+5:30
ईशान्य भारतात २०२३मध्ये २४३ हिंसक घटना घडल्या. त्यातील १८७ घटना मणिपूरमध्ये झाल्या.

ईशान्येतील हिंसाचारापैकी ७७% घटना मणिपूरमध्ये; २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये घटना वाढल्या
नवी दिल्ली : २०२३ या वर्षात ईशान्य भारतातील राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारापैकी ७७ टक्के घटना या एकट्या मणिपूरमध्ये घडल्या होत्या असे केंद्रीय गृह खात्याने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. मणिपूरमध्ये २०२२च्या तुलनेत २०२३ साली हिंसक घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान व नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले, असे या अहवालात म्हटले आहे.
ईशान्य भारतात २०२३मध्ये २४३ हिंसक घटना घडल्या. त्यातील १८७ घटना मणिपूरमध्ये झाल्या. ३ मे २०२३ रोजी मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये वांशिक हिंसाचाराचा भडका उडाला. त्यामुळे असंख्य लोक मारले गेले, जखमी झाले आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या.
गृह खात्याने म्हटले आहे की, मणिपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ हालचाली केल्या. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या अतिरिक्त कंपन्या तसेच हेलिकॉप्टर आणि ड्रोन मणिपूरमध्ये तैनात करण्यात आले.
घडले ते खेदजनक, पण स्थिती सुधारेल
- मणिपूरमध्ये हळूहळू शांतता प्रस्थापित होत आहे. नवीन वर्षात राज्यातील परिस्थिती पूर्ववत होईल, अशी मला आशा आहे. .
- मणिपूरमध्ये जे घडले ते खेदजनक आहे. या वांशिक संघर्षात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. लोकांना आपले घरदार सोडावे लागले. या सर्व गोष्टींबद्दल मी जनतेची माफी मागत आहे, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी म्हटले.
२५०हून अधिक लोकांचा मृत्यू
- गेल्या २० महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्षात राज्यातील गोळीबाराच्या घटनांमध्ये आता घट झाली आहे. मे ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ४०८ गोळीबाराच्या घटना घडल्या. नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत ३४५ वेळा गोळीबार झाला.
- मणिपूरमध्ये अधूनमधून हिंसक घटना घडत असतात. त्या राज्यात मे २०२३पासून आजवर झालेल्या वांशिक हिंसाचारात २५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.