धक्कादायक! ७ वर्षीय मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू; शाळेत खेळता-खेळता खाली कोसळली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 12:21 IST2024-12-14T12:20:28+5:302024-12-14T12:21:31+5:30
अपेक्षाचे वडील संदीप कुमार हे बिजनौर पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. ही मुलगी तिच्या आजीसोबत बागपत इथं राहते

धक्कादायक! ७ वर्षीय मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू; शाळेत खेळता-खेळता खाली कोसळली अन्...
उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका खासगी शाळेत शिकणाऱ्या ७ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अपेक्षा कुमारी असं या मुलीचं नाव आहे. शाळेच्या मैदानात खेळताना ही घटना घडली. सरुरपूरच्या योगीनाथ विद्यापीठ पब्लिक स्कूलमध्ये ही मृत मुलगी शिकायला होती. सकाळी ११ च्या सुमारास अपेक्षा तिच्या मैत्रिणीसोबत शाळेच्या मैदानात खेळत होती.
अपेक्षा कुमारी पहिल्या वर्गात शिकायला होती. शाळेच्या शिक्षकांनी सांगितले की, अपेक्षा तिच्या मित्रमैत्रिणीसोबत शाळेच्या मैदानात खेळत होती तेव्हा अचानक ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. त्यानंतर तातडीने शाळा प्रशासनाने तिच्या कुटुंबाला सूचना दिली. अपेक्षाला ३ वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टर तिचा जीव वाचवू शकले नाहीत. अपेक्षा बेशुद्ध झाली तेव्हा तिला शिक्षकांनी बडौतच्या रुग्णालयात नेले होते. या मृलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सध्या या मुलीचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी नेला असून रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार अपेक्षाचा मृत्यू हार्टअटॅकने झाल्याचं बोलले जाते. इतक्या छोट्या वयात हार्टअटॅकने मृत्यू झाल्याने डॉक्टरही हैराण आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चौकशीला सुरुवात केली आहे. अपेक्षाचे वडील संदीप कुमार हे बिजनौर पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. ही मुलगी तिच्या आजीसोबत बागपत इथं राहते.
दरम्यान, अपेक्षा ही खूप एक्टिव्ह आणि निरोगी मुलगी होती. ही घटना खूपच दुर्दैवी आहे. तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने पालकांसह शाळेलाही धक्का बसला आहे. आम्ही तिच्या कुटुंबाप्रती सहवेदना आहेत. पोलीस तपासात आम्ही सर्व सहकार्य करू असं शाळेतील शिक्षकांनी सांगितले आहे. योगीनाथ विद्यापीठात अपेक्षा कुमारीचे मामाही शिक्षक म्हणून आहेत. शाळेच्या मैदानावर एक मुलगी बेशुद्ध होऊन पडल्याचे कळाले तेव्हा सर्व शिक्षक तिथे पोहचले. तेव्हा आपली भाची असल्याचं समजताच मामाने तात्काळ इतर शिक्षकांच्या मदतीने तिला दवाखान्यात उपचारासाठी नेले होते.
कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
अपेक्षाची आई आणि वडिलांमध्ये घरगुती कारणावरून वाद आहेत. संदीप यूपी पोलीस खात्यात कार्यरत आहे. मागील २ वर्षापासून अपेक्षाची आई तिच्या माहेरी राहते. या दाम्पत्याला एकलुती एक लेक होती. तिच्या मृत्यूने आई वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.