कर्नाटकातील सिरसी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ७ वर्षांच्या मुलामुळे चुकून त्याच्या ९ वर्षांच्या भावाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करियप्पा असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो सोमनल्ली गावातील बसप्पा उंडियार यांचा मुलगा होता. ज्यावेळी घटना घडली तेव्हा तो त्याच्या ७ वर्षांच्या धाकट्या भावासोबत खेळत होता.
रिपोर्टनुसार, मुलांनी माकडांना पळवून लावण्यासाठी एका मळ्याजवळ ठेवलेली एअर गन हातात घेतली होती. खेळत असताना धाकट्या भावाने चुकून ट्रिगर दाबला आणि त्यातून निघालेली गोळी करियप्पाच्या छातीत लागली, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज चेक केलं आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक जगदीश, पोलीस उपअधीक्षक गीता पाटील आणि सीपीआय शशिकांत वर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी सिरसी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सिरसी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.