66 thousand women created 1.32 crore mask across the country! | देशभरातील ६६ हजार महिलांनी तयार केले १.३२ कोटी मास्क!

देशभरातील ६६ हजार महिलांनी तयार केले १.३२ कोटी मास्क!

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सध्याच्या कोरोना साथीत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना व सामान्य नागरिकांनाही निर्माण झालेली मास्कची मोठ्या प्रमाणावरील गरज पूर्ण करण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने महिला बचत गटांकडून असे मास्क तयार करून घेण्याचे काम ‘नॅशनल रुरल लाइव्हलीहूड मिशन’अंतर्गत युद्ध पातळीवर हाती घेतले आहे.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २४ राज्यांमधील एकूण १४,५२२ महिला बचत
गटांना हे काम देण्यात आले आहे. गेल्या
दोन आठवड्यांत या बतत गटांच्या ६५,९३२ महिलांनी एकूण एक कोटी ३२ लाख सहा हजार ७७५ मास्क तयार केले आहेत. देशभरातील एकूण ३९९ जिल्ह्यांमधील महिला बचत गट हे काम करत आहेत.
महाराष्ट्रात २५ जिल्ह्यांमधील ६०२ बचत गटांच्या २,५५८ सदस्य महिलांनी २४ एप्रिलपासून हे काम सुरू केले असून पहिल्या १० दिवसांत त्यांनी ३ लाख ६२ हजार ३३२ मास्कचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत आंध्र प्रदेश (४,२८१), तमिळनाडू (१,९२७), मध्य प्रदेश (१,५११) व राजस्थान (१,२०६) या राज्यांमधील महिला बचत गटांनी या कामाला जुंपून घेतले आहे. खास करून आंध्र प्रदेशमधील फक्त पाच जिल्ह्यांमधील महिला बचत गट हे काम करत आहेत पण त्यांनी केलेले २५ लाख ४१ हजार मास्कचे उत्पादन हे देशात सर्वाधिक आहे. त्या खालोखाल तमिळनाडूतील १०,७८० महिलांनी केलेले २६ लाख मास्कचे व केरळमधील १,५७० महिलांनी केलेले १५.७७ लाख मास्कचे उत्पादनही लक्षणीय आहे. मिझोराममध्ये
एका महिला बचत गटातील फक्त एकच
महिला हे काम करत आहे. परंतु तिनेही १०० मास्क तयार करून या देशकार्यात खारीचा वाटा उचलाला आहे. बाधित व्यक्तींची संख्या व मृत्यू या दोन्ही बाबतीत सर्व देशात महाराष्ट्राला सर्वाधिक ग्रासलेले असूनही राज्यातील एकूण ३४ पैकी २५ जिल्ह्यातील महिला बचत गटच या कामासाठी का पुढे आले किंवा एवढ्यांनाच का काम देण्यात आले, हे मात्र लगेच स्पष्ट होऊ शकले नाही. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात हे काम आठवडाभर उशिरा सुरू झाल्याचेही मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीवरून दिसते.

४महाराष्ट्रात २५ जिल्ह्यांमधील ६०२ बचत गटांच्या २,५५८ सदस्य महिलांनी २४ एप्रिलपासून हे काम सुरू केले असून पहिल्या १० दिवसांत त्यांनी ३ लाख ६२ हजार ३३२ मास्कचे उत्पादन केले आहे.
४देश संकटात असताना सरकारची योजना कशी कल्पकतेने वापरता येते व तळागळातील महिलाही या संकटाच्या निवारणात घरबसल्या किती मोठा हातभार लावू शकतात, यादृष्टीने ही आकडेवारी कौतुकास्पद आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 66 thousand women created 1.32 crore mask across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.