Coronavirus : कर्नाटकमधील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट; 66 विद्यार्थी पॉझिटिव्ह, दोन हॉस्टेल सील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 14:34 IST2021-11-25T14:33:02+5:302021-11-25T14:34:00+5:30
Coronavirus : प्रशासनाने तातडीने कारवाई करत कॉलेजच्या इमारतीतील दोन्ही हॉस्टेल सील केले आहेत. या कॉलेजमध्ये जवळपास 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Coronavirus : कर्नाटकमधील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट; 66 विद्यार्थी पॉझिटिव्ह, दोन हॉस्टेल सील
बंगळुरू : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. यात आता कर्नाटकमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. कर्नाटकमधील धारवाड येथील SDM मेडिकल कॉलेजमध्ये 66 विद्यार्थ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे येथील प्रशासनाची चिंता वाढली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करत कॉलेजच्या इमारतीतील दोन्ही हॉस्टेल सील केले आहेत. या कॉलेजमध्ये जवळपास 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळताच मेडिकल कॉलेजने सर्वांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत 300 विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात 66 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. याआधीही अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अलीकडेच राजस्थानमधील उदयपूर येथील एका शाळेत 11 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
तेलंगणामध्येही एका शाळेत 28 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. इतर अनेक राज्यांतील शाळांमधूनही अशाच बातम्या ऐकायला मिळत आहेत. ओडिशातही मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. याठिकाणी 53 शालेय विद्यार्थी आणि 22 मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
दरम्यान, सध्या कोरोनाच्या तिसर्या लाटेने दार ठोठावले नसले तरी लहान मुले आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा झपाट्याने होणारा संसर्ग, हे चांगले संकेत नाहीत. जेव्हापासून प्रत्येक राज्याने शाळा-महाविद्यालये सुरू केली आहेत, तेव्हापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आता मुलांनाही लसीकरण करायला हवे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.
सध्या सरकारने स्थापन केलेली समिती त्यावर विचार करत आहे. पुढील वर्षी जानेवारीपासून आजारी मुलांना पहिली लस दिली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. यानंतर मार्चपासून प्रत्येक मुलाला लसीकरण सुरू केले जाऊ शकते. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र सरकारने स्थापन केलेल्या समितीने अनेक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.