राज्यातील ६ जणांचा पद्म पुरस्काराने सन्मान; पूनावाला, चंद्रशेखरन यांचा पद्मभूषणनं गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 06:33 IST2022-03-22T06:33:19+5:302022-03-22T06:33:42+5:30
राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

राज्यातील ६ जणांचा पद्म पुरस्काराने सन्मान; पूनावाला, चंद्रशेखरन यांचा पद्मभूषणनं गौरव
नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी झाले. यामध्ये महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते. डॉ. सायरस पूनावाला आणि एन. चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’, तर डॉ. भीमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. हिंमतराव बावस्कर तसेच डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. सायरस पूनावाला यांना ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. या संस्थेने कोरोना प्रतिबंधक लस तयार केली. एन. चंद्रशेखरन यांनाही उद्योग व व्यापार क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. ते टाटा सन्सचे अध्यक्ष आहेत. या वर्षी एकूण १२८ पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ४ ‘पद्मविभूषण’, १७ ‘पद्मभूषण’ आणि १०७ ‘पद्मश्री’ पुरस्कार आहेत.
४ मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’
वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी डॉ. भीमसेन सिंघल यांना ‘पद्मश्री पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. डॉ. सिंघल हे नामांकित न्यूरोलॉजिस्ट आहेत. डॉ. विजयकुमार डोंगरे यांना कुष्ठरोगांवर केलल्या नि:स्वार्थ उपचारांसाठी वैद्यकीय क्षेत्रामधून ‘पद्मश्री पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. विंचूदंश आणि सर्पदंशावर केलेल्या अभ्यासासाठी डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) चे ते संचालक आहेत.