6-10 Pakistani soldiers killed as Army destroys 3 terror camps in PoK - Bipin Rawat | POK मध्ये केलेल्या धडक कारवाईबाबत लष्करप्रमुखांनी दिली मोठी माहिती  
POK मध्ये केलेल्या धडक कारवाईबाबत लष्करप्रमुखांनी दिली मोठी माहिती  

नवी दिल्ली -  सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीला भारतीय लष्कराने आज चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दहशतवाद्यांसह पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार झाले आहेत. दरम्यान, या कारवाईबाबत लष्करप्रमुख बीपीन रावत यांनी मोठी माहिती दिली आहे. लष्कराने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच सहा ते दहा पाकिस्तानी सैनिक आणि काही दहशतवादी ठार झाले आहेत, असे रावत यांनी सांगितले. 

रावत म्हणाले, ''अथमुकम, जुरा, कुंदलशाही या ठिकाणी असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांना लष्कराने लक्ष्य केले. आम्ही घुसखोरीला रोखण्यासाठी ही कारवाई केली. पाकिस्तान कसा खवळलेला आहे, हे तुम्ही पाहू शकता. तसेच बर्फवृष्टी होण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न सुरू आहेत.  

आज सकाळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तांगधर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तांगधर सेक्टरमध्ये तैनात असलेले दोन जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरा दाखल मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये तोफांचा मारा करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.  

यावेळी जवानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. तसेच, उखळी तोफांचा मारा केला. यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने मोठा दणका दिला आहे. या कारवाईत कारवाईत 11 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तर 22 हून अधिक दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले आहे. 

दरम्यान, भारतीय लष्काराच्या कारवाईनंतर केंद्र सरकार अलर्टवर असून संरक्षण मंत्रालय सुद्धा याकडे लक्ष ठेवून आहे. या कारवाई संदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत आहेत.  
 


Web Title: 6-10 Pakistani soldiers killed as Army destroys 3 terror camps in PoK - Bipin Rawat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.