तेलंगाणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात असलेल्या एका फार्महाऊसवर धाड टाकल्यानंतर दिसलेलं धक्कादायक चित्र पाहून पोलिसही अवाक् झाले. ही धाड स्पेशल ऑफरेशन्स टीम पोलीस आणि सायबराबाद पोलिसांनी टाकला होता. या दरम्यान, बेकायदेशीर कॅसिनो आणि कोंबड्यांच्या झुंजीचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी ६४ जणांना ताब्यात घेण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळावरून ३० लाख रुपयांहून अधिकची रोख रक्कम, ५५ कार आणि ८६ फायटर कोंबडे जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हे फार्महाऊस एक हायप्रोफाइल जुगार आणि कोंबड्यांच्या झुंजींचं केंद्र म्हणून वापरलं जात होतं. येथे श्रीमंत आणि प्रभावशाली लोक मोठ्या रकमेचा जुगार आणि सट्टेबाजीसाठी येत असत. येथे टाकलेल्या धाडीमधून पोलिसांनी ३० लाख रुपये रोख, ५५ कार, ८६ फायटर कोंबडे आणि जुगाराशी संबंधित इतर सामान जप्त केले.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या ६४ आरोपींमधील १० आरोपी तेलंगाणामधील रहिवासी आहेत. तर उर्वरित ५४ आरोपी हे आंध्र प्रदेशमधील रहिवासी आहेत. ही टोळी अत्यंत संघटित होती. तसेच येथील फार्महाऊसवर जुगाराबरोबच कोंबड्यांच्या झुंजी लावून मनोरंजन केलं जात असे.
आता राजेंद्रनगर आणि मोइनाबाद पोलिस या रॅकेटमधील मास्टरमाईंड आणि यात सहभागी असलेल्या अन्य लोकांची ओळख पडताळणी करत आहेत. पोलिसांच्या मते हे संपूर्ण रॅकेट संघटित टोळीकडून चालवलं जात होतं. त्यात अनेक प्रतिष्ठित लोक सहभागी आहेत.