काश्मीरमध्ये घुसखोरी करणा-या 5 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 20:13 IST2017-08-07T20:13:21+5:302017-08-07T20:13:31+5:30
काश्मीरमधल्या माचिल सेक्टर सीमेपलिकडून घुसखोरी करणा-या 5 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला आहे.

काश्मीरमध्ये घुसखोरी करणा-या 5 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर, दि. 7 - काश्मीरमधल्या माचिल सेक्टर सीमेपलिकडून घुसखोरी करणा-या 5 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केला आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील पांपोर भागातल्या संबुरा गावात कारवाई करत एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. ठार करण्यात आलेला दहशतवादी अबू इस्माइल समूहाशी संबंधित होता. तो दहशतवादी पाकिस्तानातून आला होता. तसेच त्याचं नाव उमेर होतं. जवानांनी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके 47 रायफल्स जप्त केली.
गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील काकापोरा येथे सुरक्षा दलाच्या जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू दुजानासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या परिसरात अबू दुजानासह तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराच्या जवानांना मिळाली होती. जवानांनी कारवाई करून दुजानासह 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते तेच घर सुरक्षा दलाच्या जवानांनी स्फोटकांनी उडवून दिलं होतं. सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. या लष्करानं दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून, आणखी एका दहशतवाद्याचा शोध घेतला जातोय. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकही सुरू होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. घर स्फोटात उडवून दिल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार बंद झाला होता. जवानांनी हकदीपुरा येथे शोधमोहीम सुरू केली होती.