केजरीवालांच्या नेतृत्वात 'आपने' 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 15:52 IST2023-12-03T15:51:35+5:302023-12-03T15:52:04+5:30
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात AAP ने निवडणूक लढवली, मात्र अनेक ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले.

केजरीवालांच्या नेतृत्वात 'आपने' 200 पेक्षा जास्त जागा लढवल्या, तिन्ही राज्यात मिळाला भोपळा...
5 state assembly election 2023: आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू आहे. यातील मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने सत्ता खेचून आणली आहे, तर तेलंगणात पहिल्यांदाच काँग्रेसचे सरकार स्थापन होत आहे. या सर्व राज्यांमध्ये दिल्ली-पंजाबमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षानेही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली होती. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी स्वतः अनेक रॅली आणि रोड शो केले होते. मात्र, पक्षाला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले.
दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर अरविंद केजरीवालांनीआपला मोर्चा इतर राज्यांकडे वळवला आहे. गेल्या वर्षी त्यांनी गुजरात विधानसभा निवडणूक लढवली, ज्यात त्यांना अपयश आले. आताही त्यांनी राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, या तीन हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये आपले उमेदवार उभे केले. आपने मध्य प्रदेशात 70 हून अधिक जागांवर, राजस्थानमध्ये 88 जागांवर आणि छत्तीसगडमध्ये 57 जागांवर उमेदवार उभे केले होते. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे या राज्यांमध्येही मोफत वीज, पाणी आणि शिक्षण देण्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. अनेक मोर्चे आणि रोड शो करूनही 'आप'ला काही फायदा झाला नाही.
'आप'चे खाते उघडले नाही
'आप'ने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 200 हून अधिक उमेदवार उभे केले होते. मात्र, एकही जागा जिंकता आली नाही. बहुतांश जागांवर 'आप'च्या उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. सिंगरौली नगराध्यक्ष आणि आपच्या उमेदवार राणी अग्रवाल यांचाही पराभव होताना दिसत आहे. याशिवाय टीव्ही अभिनेत्री चाहत पांडेचाही जामीन जप्त झाल्याचे समजते.
'आप'ला किती मते मिळाली?
आम आदमी पक्षाने तेलंगणात उमेदवार दिले नाहीत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, छत्तीसगडमध्ये आम आदमी पक्षाला 0.97% मते मिळत आहेत. तर मध्य प्रदेशात 0.42% आणि राजस्थानमध्ये 0.37% मते मिळत आहेत.