अतिरेक्यांना घेरल्यानंतर ५ जवान स्फाेटात शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये भीषण चकमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 09:04 IST2023-05-06T09:03:52+5:302023-05-06T09:04:09+5:30
स्फोटात सकाळी विशेष दलाचे दोन जवान शहीद झाले आणि एका मेजरसह चार लष्करी जवान जखमी झाले.

अतिरेक्यांना घेरल्यानंतर ५ जवान स्फाेटात शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये भीषण चकमक
राजौरी : पूंछमध्ये लष्करी ट्रकवर हल्ला करणारे दहशतवादी जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील कंडी जंगलाच्या परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावरून शुक्रवारी लष्करी जवानांनी त्यांना घेरले; परंतु दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात लष्कराचे पाच जवान शहीद झाले आणि एक मेजर दर्जाचा अधिकारी जखमी झाला. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करी कारवाई अजूनही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्फोटात सकाळी विशेष दलाचे दोन जवान शहीद झाले आणि एका मेजरसह चार लष्करी जवान जखमी झाले. त्यानंतर उधमपूर येथील रुग्णालयात तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला. ‘अजूनही कारवाई सुरूच आहे,’ असे उधमपूरमधील लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. राजौरी भागात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
लष्कराच्या उत्तरी कमांडने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंडी जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे ३ मे रोजी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली. शोधपथकाने शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गुहेत लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाला घेरले. दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. जवळपासच्या भागांतून अतिरिक्त कुमक चकमकीच्या ठिकाणी पाठवण्यात आली आहे.
शस्त्रास्त्रे जप्त, एकाला अटक
जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी एका घरातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्यानंतर एका व्यक्तीला अटक केली. गुरुवारी त्रालच्या लुरगाम भागात शोधमोहीम राबवण्यात आली. झडतीदरम्यान बशीर अहमदच्या घरातून एक कलाश्निकोव्ह रायफल, दोन मॅगझिन आणि ५६ राउंड दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
राजकीय पक्षांकडून शोक व्यक्त
जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय पक्षांनी शुक्रवारी राजौरी जिल्ह्यात झालेल्या स्फोटात पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला.