५९ बालकांना एकच सुई व इंजेक्शन वापरल्याने पालक संतप्त
By Admin | Updated: March 3, 2015 15:52 IST2015-03-03T15:47:27+5:302015-03-03T15:52:53+5:30
निलोफर सरकारी रुग्णालयात उपचाराकरता आलेल्या ५९ बालकांना एका नर्सने एकच सुई व इंजेक्शन वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे.

५९ बालकांना एकच सुई व इंजेक्शन वापरल्याने पालक संतप्त
>
ऑनलाइन लोकमत
हैद्राबाद, दि. ३ - निलोफर सरकारी रुग्णालयात उपचाराकरता आलेल्या ५९ बालकांना नर्सने एकच सुई व इंजेक्शन वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे. हे प्रकरण लक्षात येताच पालकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाबाबत संताप व्यक्त केला.
जुलाब, ताप व इतर सामान्य आजारांची लागण झालेल्या बालकांना उपचाराकरता रुग्णालयात आणले असता रात्रपाळीला असलेल्या प्रमिला नर्सने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयातील काही कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय अधिकारी जे. कृष्णा व ज्यूड स्मिथ गैरहजर होते. इंजेक्शन देण्यात आलेल्या बालकांचे वय तीन महिने ते चार वर्ष इतके आहे. तसेच इंजेक्शन घेतलेल्या ठिकाणी बालकांना सूज आली असल्याचे अढळून आले आहे. रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर के . देवराज यांनी बालकांना दक्षता विभागात दाखल करून घेतले असून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आश्चर्य म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने तीन दिवसांपूर्वीच ऑटो डिसेबल सिरींजबाबत घोषणा केल्यानंतर हा प्रकार घडला आहे. स्थानिक माध्यमांनी ही बाब उघड केली असता ,राज्यातील सर्व रुग्णालयातील नर्सना इंजेक्शन देण्याचे अधिकृत शिक्षण दिले असल्याची खातरजमा करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.