नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार लवकरच चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. चौथ्या वर्षपूर्तीनिमित्तानं सरकारकडून रोजगार निर्मितीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र यामध्ये मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी अनेकदा केली आहे. त्यामुळेच गेल्या चार वर्षांमध्ये रोजगाराच्या किती संधी निर्माण झाल्या, याची माहिती सरकार देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मंत्रालयांना त्यांच्या विभागांकडून प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे निर्माण झालेल्या रोजगारांची आकडेवारीची माहिती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीची योजना तयार करणारी समिती या माहितीला प्राधान्य देत असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली. 'सर्व मंत्रालयं आणि संबंधित विभाग ठराविक कालावधीत त्यांच्या कामाची माहिती देत असतात. आता सर्व मंत्रालयं आणि विभागांना रोजगार निर्मितीची आकडेवारी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या संधी नेमक्या किती वाढल्या, याची माहिती सरकारच्या विशेष समितीकडून गोळा केली जात आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली.सर्व क्षेत्रांमधील माहिती जमा केल्यावर एक चांगला अहवाल तयार होईल अशी आशा आहे, असं समितीमधील एका सदस्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं. रोजगार निर्मितीच्या मुद्यावरुन काँग्रेसनं वारंवार मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका वर्षात 2 कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन पाळण्यात मोदी अपयशी ठरले, अशी टीका काँग्रेसनं अनेकदा केली आहे. राहुल गांधींनी या मुद्यावरुन मोदींवर वारंवार शरसंधान साधलं आहे. 'चीन दर 24 तासात 50 हजार तरुणांना रोजगार देतं. मात्र मोदी सरकारला 24 तासांमध्ये रोजगाराच्या केवळ 450 संधी निर्माण करता येतात,' अशी टीका राहुल गांधींनी केली होती.
चार वर्षांमध्ये किती रोजगार, लवकरच सांगणार मोदी सरकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2018 07:23 IST