४०१ खासदारांनी अद्याप जमा केला नाही संपत्तीचा तपशील
By Admin | Updated: October 27, 2014 01:40 IST2014-10-27T01:40:21+5:302014-10-27T01:40:21+5:30
विद्यमान लोकसभेच्या सुमारे तीन चतुर्थांश सदस्यांनी अद्यापही लोकसभा सचिवालयात आपले संपत्ती विवरण जमा केलेले नाही़

४०१ खासदारांनी अद्याप जमा केला नाही संपत्तीचा तपशील
नवी दिल्ली : विद्यमान लोकसभेच्या सुमारे तीन चतुर्थांश सदस्यांनी अद्यापही लोकसभा सचिवालयात आपले संपत्ती विवरण जमा केलेले नाही़ यात खुद्द लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, उमा भारती, नितीन गडकरी व सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांचा समावेश आहे़
माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती समोर आली आहे़ लोकसभा सदस्य: संपत्ती नियम २००४ अंतर्गत प्रत्येक सदस्याने सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ९० दिवसांच्या आत संपत्तीचे विवरण दाखल करणे गरजेचे आहे़ मात्र अद्यापही विद्यमान ४०१ सदस्यांनी हे विवरण दाखल केलेले नाही़ यात भाजपाचे २०९ सदस्य, काँग्रेसचे ३१, तृणमूल काँग्रेसचे २७, बीजू जनता दलाचे १८, शिवसेनेचे १५, तेलगू देसम पार्टीचे १४, अण्णाद्रमुकचे ९ आणि तेलंगण राष्ट्र समितीच्या आठ सदस्यांचा समावेश आहे़ याशिवाय वायएसआर काँग्रेसचे सात, लोक जनशक्ती पार्टीचे सहा, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रत्येकी चार तसेच अकाली दल, राजद व आपच्या प्रत्येकी तीन व जदयू व अपना दलच्या प्रत्येकी दोन सदस्यांची नावे आहेत़ डॉ़ हर्षवर्धन, अनंत गीते, रामविलास पासवान, महबूबा मुफ्ती़, सुप्रिया सुळे यांच्या नावांचा यात समावेश आहे़़ (लोकमत न्यूज नेटवर्क)