Delhi Schools Bomb Threat: राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा ४० हून अधिक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शाळांच्या इमारतीत अनेक बॉम्ब ठेवण्यात आले असून, पैशांची मागणी पूर्ण न झाल्यास त्यांचा स्फोट केला जाईल, असा ईमेल या शाळांना पाठवण्यात आला आहे. ईमेल पाठवणाऱ्याने ३० हजार डॉलर्सची मागणी केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा रिकामी करण्यात आल्या. गेल्या काही महिन्यांत शाळांना अशा धमक्या अनेकदा आल्या आहेत. मात्र त्यानंतर अफवा असल्याचे समोर आलं होतं.
दिल्लीत सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरके पुरमच्या डीपीएस, पश्चिम विहारच्या जीडी गोएंका स्कूल, मदर मेरी स्कूलसह ४० शाळा व्यवस्थापनांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. तोपर्यंत मुले त्यांच्या वर्गासाठी पोहोचली होती. धमकीच्या मेलनंतर शाळा प्रशासनाने तात्काळ मुलांना घरी पाठवून पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
"मी शाळेच्या इमारतींमध्ये अनेक बॉम्ब पेरल्याचे लिहिले आहे. बॉम्ब लहान आणि अतिशय योग्य पद्धतीने लपवलेले आहेत. त्यामुळे इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही, मात्र बॉम्बचा स्फोट झाल्यास अनेक जण जखमी होतील. जर मला ३०,००० डॉलर मिळाले नाहीत तर मी बॉम्बस्फोट करीन," असं ईमेलमध्ये म्हटलं आहे.
दिल्लीतील शाळा, विमानतळ, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी बॉम्बच्या धमक्या देण्याचे प्रकरण अद्यापही संपलेलं नाही. काही दिवसांपूर्वीही दिल्लीतील रोहिणी येथील एका खासगी शाळेला बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. यानंतर दिल्ली अग्निशमन विभागाचे एक पथक तपासणीसाठी शाळेच्या कॅम्पसमध्ये पोहोचले आणि धमकीची अफवा असल्याचे समोर आलं.
दरम्यान, २० ऑक्टोबर रोजी, दिल्लीच्या रोहिणी भागातील एका सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ जोरदार स्फोट झाला होता ज्यामुळे जवळपासची दुकाने आणि वाहनांचे नुकसान झाले आणि इमारतीच्या भिंतीलाही छिद्र पडलं होतं. या स्फोटामुळे कोणीही जखमी झालेलं नव्हतं. खलिस्तानी समर्थक गटाने टेलिग्रामवरील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच गेल्या काही महिन्यांत, अनेक भारतीय विमान कंपन्या, हॉटेल्स, रेल्वे स्थानकांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत, त्या सर्व अफवा ठरल्या आहेत.