निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 05:55 IST2025-05-05T05:55:10+5:302025-05-05T05:55:20+5:30
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अधिकाऱ्यांच्या परिषदेत या प्लॅटफॉर्मबाबतचा प्रस्ताव मांडला होता.

निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे. आयोगाने मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा ‘डिजिटल इंटरफेस’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या ४० हून मोबाइल आणि वेब ॲप्सना एका प्लॅटफॉर्मवर आणले जाणार आहे.
‘ईसीआयनेट’ असे या इंटरफेसचे नाव असेल. निवडणूक संबंधित कामांसाठी हा मंच उपयोगी ठरणार आहे, असे आयोगाने रविवारी स्पष्ट केले. मतदारांना ॲप डाऊनलोड करण्याची आणि त्यांचे वेगवेगळे लॉगिन लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अधिकाऱ्यांच्या परिषदेत या प्लॅटफॉर्मबाबतचा प्रस्ताव मांडला होता.
अधिक सोपे
‘ईसीआयनेट’मुळे मतदारांना डेस्कटॉप किंवा स्मार्टफोनवर निवडणूक संबंधित माहिती जाणून घेणे शक्य होईल.
या मंचावर डेटा अधिकाऱ्यांद्वारेच नोंदविला जाणार आहे. अचूकतेबाबत दक्षता घेतलेली असेल.
मतदारांची कशी सोय होणार?
सर्व कामे एका ठिकाणी : मतदारांना मतदान केंद्र शोधणे, मतदार यादीतील नाव पाहणे, तक्रार नोंदवणे, अर्ज भरणे आदी कामे एकाच ठिकाणी करणे शक्य होईल.
विश्वसनीय माहिती : डेटा अधिकृत अधिकाऱ्यांकडून भरल्याने खोटी माहिती किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रसार रोखला जाणार आहे.
सहज उपलब्धता : हा प्लॅटफॉर्म स्मार्टफोन व डेस्कटॉप दोन्हीवर वापरता येईल. ग्रामीण भागात किंवा ज्यांच्याकडे संगणक नाही अशांची सोय होणार आहे. सिव्हिजल सारखे तक्रार ॲपमुळेही तक्रार करणे सोपे होणार आहे.