ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. खेळताना एका ४ वर्षांच्या मुलाचं डोकं स्टीलच्या भांड्यात अडकलं. जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी मुलांकडे पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी मुलाचं डोकं स्टीलच्या भांड्यातून काढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र अथक प्रयत्न करूनही त्यांना यश आलं नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेलं.
डॉक्टरांनी काळजीपूर्वक स्टीलचं भांडं कापून लहान मुलाचा जीव वाचवला. बोनाई पोलीस हद्दीतील जांगला गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम नावाचा मुलगा घरी खेळत होता. यावेळी त्याचं डोकं चुकून स्टीलच्या भांड्यात अडकलं. कुटुंबाने डोकं बाहेर काढण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न केले, परंतु ते घट्ट असल्याने बाहेर काढणं अशक्य झालं.
घाबरून शुभमच्या पालकांनी त्याला बोनाई उपविभागीय रुग्णालयात नेलं. सुरुवातीला, डॉक्टरांनी भांडं हाताने काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले. जेव्हा मुलाची प्रकृती गंभीर झाली तेव्हा कुटुंबाने त्याला पुढील उपचारांसाठी राउरकेला येथे नेण्याचा विचार केला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला.
डॉ. प्रभात रंजन सिंह यांनी मेडिकल स्टाफ आकाश राय आणि वीरेंद्र नायक यांच्या मदतीने यावर उपाय शोधला. यानंतर कात्री आणि कटर वापरून, त्यांनी स्टीलचं भांडं काळजीपूर्वक कापलं. मग शुभमचं डोकं बाहेर काढलं. ज्यामुळे त्याचा जीव वाचला. शुभम आता सुरक्षित आहे आणि त्याची प्रकृती सुधारत आहे.