झाडावर वीज पडली अन् चार माणसं जणू पुठ्ठ्याप्रमाणे कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:31 IST2021-03-12T20:29:01+5:302021-03-12T20:31:02+5:30
सोसायटीत असलेल्या सीसीटीव्हीत अंगावर काटा आणणारी घटना कैद; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

झाडावर वीज पडली अन् चार माणसं जणू पुठ्ठ्याप्रमाणे कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEO
नवी दिल्ली: जोरदार पाऊस कोसळत असल्यास अनेक जण आसरा शोधतात. मात्र आकाशात विजा चमकत असताना निर्माणाधीन इमारतीचा, झाडांचा आडोसा घेणं धोकादायक ठरू शकतं. हरयाणातल्या गुरुग्राममध्ये याचा प्रत्यत देणारी एक घटना घडली आहे. झाडावर वीज कोसळल्यानं झाडाखाली आश्रयाला उभे असलेले चार जण जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.
दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. गुरुग्रामच्या सेक्टर ८२ मधील वाटिका सिटीत वीज कोसळल्यानं झाडाखाली उभ्या असलेल्या चौघांना दुखापत झाली आहे. अंगावर अक्षरश: काटा आणणारी ही घटना संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.
गुरुग्राम में आकाशीय बिज़ली गिरने से 4 गंभीर रूप से घायल, वीडियो में दिखा हादसा। @JagranNewspic.twitter.com/5PotOhhSMC
— Vinay K Tiwari (@Vinay_Journalis) March 12, 2021
पावसाचा जोर वाढल्यानं बगिच्यात काम करणाऱ्या चार व्यक्तींनी झाडाखाली आसरा घेतला. तितक्यात आकाशातून वीज कोसळली. झाडावर वीज पडताच झाडाखाली उभे असलेले चारही जण जमिनीवर कोसळले. जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या मानेसरमधल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यक्ती कोण आहेत, त्यांची नावं काय, याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही. मात्र अंगावर शहारे आणणारी ही घटना सोसायटीत असलेल्या एका फ्लॅटबाहेरील कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आज सकाळपासूनच दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्येही पाऊस सुरू आहे. डोंगराळ भाग असलेल्या राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. त्यामुळे उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पुढील एक ते दोन दिवस वरुणराजाचा मुक्काम असण्याची शक्यता आहे.