हरयाणामधील कुरुक्षेत्र येथे रात्री एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. तर कुटुंबातील एक मुलगा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये पती, पत्नी त्यांच्या मुलगा, सून यांचा समावेश आहे. तर नातू गंभीर जखमी स्थितीत आहे. वृद्ध दाम्पत्याच्या गळ्यावर धारदार हत्याराने हल्ला केल्याच्या खुणा सापडल्या आहेत.
सकाळी घरातील कुणीच व्यक्ती बाहेर न पडल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घरात प्रवेश केला तेव्हा कुटुंबातील सदस्य रक्तबंबाळ स्थितीत सापडले. मृतांची ओळख शाहाबादमधील यारा गावातील रहिवासी नैब सिंह, त्यांची पत्नी इमरित कौर, मुलगा दुष्यंत आणि सून अमृत कौर यांचा समावेश आहे. तर नैब सिंह यांचा नातू केशव हा जखमी झाला आहे.
एकाच कुटुंबातील चार सदस्यांची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. या कुटुंबासोबत रात्री काय घडलं, याबाबत सध्यातरी कुठली माहिती समोर आलेली नाही. स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली असून, तपास करत आहे. तसेच आजूबाजूच्या सीसीटीव्हीमधून या घटनेबाबतचे पुरावे गोळा केले जात आहेत.