नरेंद्र मोदींनी दिला विकासाचा ३ पी फॉर्म्यूला
By Admin | Updated: August 12, 2014 11:38 IST2014-08-12T11:36:12+5:302014-08-12T11:38:06+5:30
लेहमधील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी विकासाचा ३ पी फॉर्म्यूला मांडला.

नरेंद्र मोदींनी दिला विकासाचा ३ पी फॉर्म्यूला
>ऑनलाइन टीम
लेह (जम्मू काश्मीर), दि. १२ - लेहमधील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी विकासाचा ३ पी फॉर्म्यूला मांडला. प्रकाश, पर्यावरण आणि पर्यटन या तीन शक्तींचे नियोजन व विकास केल्यास केवळ लेह लडाखच नव्हे तर संपूर्ण भारताचा विकास होऊ शकतो असे मोदींनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी काश्मीर दौ-यावर आले असून या दौ-यात ते दोन विजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. यातील लेह येथील पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन करताना मोदींनी लेहलडाखच्या विकासाची ग्वाही दिली. 'लोकसभा निवडणुकीदरम्यान लेह लडाखच्या जनतेने मी पाठवलेल्या लिखीत भाषणावरही भरभरुन प्रतिसाद दिला. लेह लडाखमधील जनतेने दाखवलेले प्रेम मी व्याजासकट परत करीन' असे मोदींनी सांगितले. लेह लडाखमध्ये विशाल नैसर्गिक संपत्ती असून हा परिसर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करु शकतो. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी आम्ही राज्यसरकारसोबत मिळून काम करु असे मोदींनी नमूद केले. जम्मू काश्मीरमध्ये केशर क्रांती घडवून आणण्यासोबतच हिमालय पर्वतरागांमधील राज्यांमध्ये ऑर्गेनिक शेती व्हावी आणि या शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपठे उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराविरोधात लढाई तीव्र करणार
देशभरात भ्रष्टाचार वाढला असून भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा आणखी तीव्र करु अशी ग्वाही मोदींनी दिली. या लढ्यासाठी आम्ही अन्य राजकीय पक्षांमधील भ्रष्टाचारविरोधात लढणारे नेते, प्रशासकीय अधिका-यांचीही मदत घेऊ असे मोदींनी जाहीर केले. ही लढाई जिंकल्यास देशातील गरिबीवरही मात करता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.