गुवाहाटी : आसाममध्ये शिवसागर जिल्ह्यात पुराचे पाणी आता ओसरले आहे. मात्र या राज्यातील ३३ पैकी २८ जिल्ह्यांतील सुमारे ५४ लाख लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्यांची संख्या ३६वर पोहोचली आहे.काझीरंगा व पोबितोरा येथील अभयारण्यांतील एकशिंगी गेंडे व अन्य प्राणी मोठ्या संख्येने ब्रह्मपुत्रा नदीच्या पुराच्या पाण्यात अडकून पडले आहे. या नदीने राज्यातील गुवाहाटी व अन्य ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे की, मोरीगावमध्ये पुरामुळे तीन, विश्वनाथमध्ये दोन, सोनितपूर, उदलगुरी, बोंगाईगाव, बारपेटा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. बारपेटामध्ये १३.४८ लाख लोकांना पुराचा फटका बसला असून तेथील चार हजार घरांचे नुकसान झाले आहे. १३० प्राणी वाहून गेले असून त्याशिवाय लहान, मोठ्या २५ लाख प्राण्यांना व पोल्ट्रीतील कोंबड्या आदी २५ लाख पक्ष्यांना पुराचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यात २.२६ लाख लोकांनी घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. पूरग्रस्तांसाठी ६८९ निवारा शिबीरे उघडण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे कर्नाटकातील मंगळुरू रेल्वे स्थानकात बुधवारपासून गुडघ्यापर्यंत पाणी साचले असून त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा स्थितीतही रेल्वेवाहतूकीवर फारसा परिणाम झालेला नाही. मंगळुरू मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे सखल भागात पाणी साचल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (वृत्तसंस्था)
आसाममध्ये मुसळधार पावसाचे ३६ बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 04:28 IST