पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसीय मॉरिशस दौऱ्यावर गेले आहेत. आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिवस सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे आहेत. ११ मार्चला जेव्हा पंतप्रधान मोदी मॉरिशसला पोहचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्थानिक मॉरिशस महिलांनी बिहारी 'गीत गवई' गायली. बिहारी गीत केवळ गाणे नाही तर ती मॉरिशसी परंपरा आहे कारण १९१ वर्षापूर्वी भारतातून गेलेल्या ३६ बिहारी मजुरांनी मॉरिशस देश वसवल्याचा इतिहास आहे.
काय आहे इतिहास?
१८ व्या शतकाची ही गोष्ट आहे, भारतात दुष्काळ आणि भूकबळीनं जवळपास ३ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नुकतेच ब्रिटिशांनी भारतावर पकड मजबूत करायला सुरूवात केली होती. ब्रिटीश सरकारने त्याचा फायदा घेत यातून एक मार्ग काढला जो द ग्रेट एक्सपेरिमेंट नावानं ओळखला जातो. या अंतर्गत मजुरांना कर्जाच्या बदल्यात काम करण्याची ऑफर दिली. म्हणजेच जर एखाद्या मजुरावर कर्ज असेल आणि त्याला ते फेडता येत नसेल तर त्याने इंग्रजांची गुलामी करायची. त्यासाठी एक ठराविक कालावधी निश्चित केला. गुलामीच्या बदल्यात मजुरांची कर्जातून मुक्तता व्हायची.
त्याकाळी इंग्रजांना चहा आणि कॉफीची सवय लागली ज्यात साखरेचा वापर होत असे. त्यावेळी साखरेचे उत्पादन कॅरिबियन आयलँड म्हणजे मॉरिशस आणि आसपासच्या बेटांवर व्हायचे. त्यामुळे ब्रिटिशांनी कॅरिबियन बेटांवर ऊसाची शेती वाढवली ज्यासाठी भारतीय मजुरांना मॉरिशसला आणलं गेले. १० सप्टेंबर १८३४ साली कोलकाताहून एटलस नावाच्या जहाजातून ३६ बिहारी मजूर मॉरिशसला गेले. ५३ दिवसांच्या प्रवासानंतर हे मजूर २ नोव्हेंबर २८३४ साली जहाजातून मॉरिशसला पोहचले.
मॉरिशसमध्ये भारतीय लोकसंख्या वाढली कशी?
ब्रिटीश सरकारने भारतीय मजुरांना ५ वर्ष नोकरी देण्याचं आश्वासन देत मॉरिशसला पाठवले. पुरुषांसाठी ५ रूपये आणि महिलांसाठी ४ रूपये महिना पगार दिला जात होता. मॉरिशसला पाठवण्यापूर्वी त्यांच्याकडून करार करून घेण्यात आला त्याला भारतीय गिरमिट म्हटलं जाते. हा करार ब्रिटीश अधिकारी जॉर्ज चार्ल्स याने बनवला होता. ३६ मजूर मॉरिशसला गेल्यानंतर वर्षोनुवर्षे हा सिलसिला सुरू होता. १८३४ ते १९१० या काळात ४.५ लाख मजूर भारतातून मॉरिशसला पाठवले गेले. भारतीय मजूर तिथे काम करत स्थायिक झाले. त्यांच्या पुढील पिढीने मॉरिशसला त्यांचा देश मानला. ५ वर्षाच्या करारामुळे मजूर कालावधी संपण्याआधी पुन्हा भारतात येऊ शकत नव्हते. १९ व्या शतकात साखरेचे उत्पादन जवळपास सर्वच देशात सुरू झाले. त्यानंतर औद्योगिक क्रांती आली आणि लोक त्यांच्या हक्कासाठी लढू लागले.
१९३१ साली मॉरिशसमध्ये ६८ टक्के लोकसंख्या भारतीय होती. याठिकाणी मजुरीसाठी आलेल्या कुटुंबात रामगुलाम कुटुंबही होते ज्यांनी मॉरिशसला इंग्रजी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी भारतीय परंपरा, विशेषत: भोजपुरी भाषा आणि हिंदू धर्माला प्रोत्साहन दिले. १९३५ साली मोहित रामगुलाम यांचे चिरंजीव शिवसागर रामगुलाम इंग्लंडहून शिक्षण घेऊन मॉरिशसला परतले. त्यांनी मॉरिशसमधील मजुरांचा अधिकार आणि मतदानाचा हक्क यासाठी संघर्ष सुरू केले. १९६८ साली जेव्हा मॉरिशसला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा शिवसागर रामगुलाम हे मॉरिशसचे राष्ट्रपिता आणि पहिले पंतप्रधान बनले.