बिजापूर (छत्तीसगड): छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा टेकड्यांभोवती असलेल्या घनदाट जंगलातील व्यापक कारवाईत केंद्रीय व राज्य सुरक्षा दलांनी मागील २१ दिवसांत ३१ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवले.
सीआरपीएफच्या महासंचालकांनी सांगितले की, २१ एप्रिलपासूनच्या २१ दिवसांच्या कारवाईत ३१ माओवादी मारले गेले. त्यापैकी २८ जणांची ओळख पटवण्यात आली आहे.
ही तर शेवटाची सुरुवात!
या पहाडीवरील मोहिमेबाबत १४ मे रोजी छत्तीसगडचे पोलिस महासंचालक अरुण देव गौतम व राज्य राखीव दलाचे पोलिस महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. माओवाद्यांच्या बटालियन क्र. १ चा कमांडर व जहाल नेता वासे हिडमा, देवा, दामोदर, आझाद व सुजाता यांचे हे आश्रयस्थान मानले जाते. कठीण भूभागामुळे सर्व मृतदेह बाहेर काढता आलेले नाहीत किंवा जखमींना अटक करता आली नाही. मोठा दारूगोळा, डिटोनेटर, वैद्यकीय साहित्य, विद्युत उपकरणे, नक्षली साहित्य असे १२०० किलोचे साहित्य जप्त करण्यात आले. दीडशेवर बंकर नष्ट करून सुरक्षा दलाने माओवाद्यांना मोठा हादरा दिला.
नक्षलविरोधी कारवाईत ऐतिहासिक यश : शाह
नवी दिल्ली : छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर ३१ नक्षलवाद्यांना ठार करून सुरक्षा दलांनी देशाच्या नक्षलमुक्तीच्या संकल्पात ऐतिहासिक यश मिळवले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. ही कारवाई २१ दिवसांत पूर्ण केली आणि सुरक्षा दलांतील एकही बळी गेला नाही, याचा मला खूप आनंद आहे, असे ते म्हणाले.