5 रुपयांच्या चहावर 30 मिनिटांचा इंटरनेट डेटा फ्री
By Admin | Updated: October 21, 2016 15:34 IST2016-10-21T15:34:33+5:302016-10-21T15:34:33+5:30
23 वर्षीय सईद खादर बाशाने पाच रुपयांची चहा पिणा-या ग्राहकांना 30 मिनिटांचा इंटरनेट डेटा फ्री अशी ऑफरच चालू केली आहे

5 रुपयांच्या चहावर 30 मिनिटांचा इंटरनेट डेटा फ्री
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 21 - बलारी येथील एका चहावाल्याने आपला धंदा वाढवण्यासाठी एक भन्नाट कल्पना लढवली आहे. 23 वर्षीय सईद खादर बाशाने पाच रुपयांची चहा पिणा-या ग्राहकांना 30 मिनिटांचा इंटरनेट डेटा फ्री अशी ऑफरच चालू केली आहे. यासाठी सईदने आफल्या दुकानात वाय-फाय राऊटरही लावून घेतला आहे. या नव्या स्किममुळे सईदचा धंदा चौपटीने वाढला आहे.
या नव्या ऑफरमुळे सईदच्या दुकानाला आणि पर्यायाने त्याच्या चहाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. सईदच्या दुकानाबाहेर ग्राहकांची रांगच लागलेली असते.
सईदने स्थानिक केबल ऑपरेटरच्या मदतीने अनलिमिटेड डेटा प्लान आणि वाय-फाय राऊटर घेतला आहे. जो कोणी सईदच्या दुकानावर चहा पिण्यासाठी येतो, त्याला एक कूपन आणि वाय-फायचा पासवर्ड दिला जातो. ग्राहकाने इंटरनेट वापरासाठी लॉग इन केल्यानंतर 30 मिनिटांनंतर आपोआप इंटरनेट बंद होईल. यासाठी सईदने विशेष सिस्टीम बसवून घेतली आहे. तसंच एक ग्राहक दिवसातून एकदाच इंटरनेट वापर करेल याची काळजी घेतली जाते.
'अगोदर एका दिवसात 100 लोक चहा पिण्यासाठी यायचे. मात्र इंटरनेट सुरु केल्यापासून हा आकडा 400वर पोहोचला आहे,' असं सईद सांगतो. बंगळुरुसारख्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी वाय-फाय झोन आहेत. तसंच अनेक मोबाईल ऑपरेटर फ्री डेटा देतात. यामध्ये नवीन असं काही नाही, पण सिरुगप्पासारख्या शहरामध्ये सर्व सोयी सुविधा अजून उपलब्ध झालेल्या नाहीत. इंटरनेट वापरदेखील अजून पुर्णपणे होत नाही आहे. त्यामुळे सईदची ही स्किम यशस्वी झाली आहे.