Mahakumbh Stampede: महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्यांची अधिकृत आकडेवारी घटनेच्या सुमारे २० तासांनंतर प्रशासनाने जाहीर केली. या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. तर ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना प्रयागराजमधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वांवर सरकारी खर्चाने उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. मौनी अमावस्येला पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक जमल्यानंतर त्रिवेणी संगमावर ही चेंगराचेंगरीची घटना घडली.
महाकुंभ मेळ्यादरम्यान त्रिणेवी संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले आहेत. कुंभमेळा प्रशासनाने ही माहिती दिली आहे. मंगळवार-बुधवारी रात्री दोनच्या सुमारास महाकुंभात चेंगराचेंगरी झाली. यावेळी अनेक भाविक चेंगराचेंगरीत सापडले. या घटनेनंतर अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
या घटनेत अनेकांनी आपल्या कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती गमावल्या आहेत. कुंभनगरचे उपमहानिरीक्षक वैभव कृष्णन यांनी सांगितले की, प्रचंड गर्दीमुळे बॅरिकेड तुटले. त्यामुळे चेंगराचेंगरीत लोकांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीडच्या सुमारास आखाडा मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे बॅरिकेडिंग तोडून आत घुसलेल्या जमावाने आंघोळीसाठी थांबलेल्या लोकांना चिरडण्यास सुरुवात केली.
प्रयागराज सेवा समितीचे निमंत्रक तीर्थराज पांडे बच्चा भैय्या यांच्या नेतृत्वाखाली संगम आणि कुंभमेळा परिसरात तुलसी मार्गावर शिबिर सुरू आहे. अमृतस्नान करण्यासाठी रात्री दोन वाजता त्रिवेणी संगमावर बहुतांश भाविक जमले होते. काही भाविक जिथे झोपले होते त्यापुढील बॅरिकेडिंग तोडून काही भाविक संगमाच्या दिशेने धावत गेले. त्यामुळे झोपलेल्या भाविकांना उठण्याचीही संधी मिळाली नाही. सर्वजण त्यांना चिरडत गेले, असं एकाने सांगितले.
चेंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेने अमृत स्नान करण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर गर्दी झाल्यानंतर आखाड्यांनी अमृतस्नानात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. स्नानासाठी संगम येथील साधू-मुनींवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सर्व १३ आखाड्यांनी अमृतस्नान केले.