देशात ३ नवे एम्स, १५७ मेडिकल कॉलेज; नागपुरात नवे एम्स; गोंदिया, नंदुरबार जिल्ह्यात कॉलेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:29 IST2022-03-26T06:28:26+5:302022-03-26T06:29:17+5:30
नागपूर येथे नवीन एम्स स्थापन करण्यात येणार

देशात ३ नवे एम्स, १५७ मेडिकल कॉलेज; नागपुरात नवे एम्स; गोंदिया, नंदुरबार जिल्ह्यात कॉलेज
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात ३ नवीन एम्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एम्सची एकूण संख्या २२ होणार आहे. याशिवाय देशात १५७ नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात नागपूर येथे नवीन एम्स स्थापन करण्यात येणार आहे.
देशात सध्या १९ एम्स कार्यरत आहेत. बिहार आणि जम्मू- काश्मीर या दोन राज्यांत प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी दोन एम्स अनुक्रमे दरभंगा आणि अवनीपुरा येथे स्थापन करण्यात येणार आहेत. हरयाणात मनेठीत एक अतिरिक्त एम्स स्थापन करण्यात येणार आहे.
नव्या १५७ मेडिकल कॉलेजपैकी गोंदिया आणि नंदुरबार जिल्ह्यात दोन मेडिकल कॉलेज स्थापन करण्यात येणार आहेत. सर्वाधिक २७ मेडिकल कॉलेज उत्तर प्रदेशला मिळणार आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश १४, ओडिशा ७, राजस्थान १४, जम्मू- काश्मीर ७, प. बंगालमध्ये ११ याप्रमाणे नवे मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहेत. यासाठी २३ हजार कोटी रुपये तीन टप्प्यांत लागणार आहेत.
मागास जिल्ह्यांना प्राधान्य
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सभागृहात सांगितले होते की, आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हे मेडिकल कॉलेज आणि एम्स स्थापन करण्यात येणार आहेत. मागास जिल्ह्यांना यात प्राधान्य देण्यात येणार आहे. अनेक राज्यांत जमीन उपलब्ध होत नसल्याने या योजनांना उशीर होत आहे.