नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी तीन न्यायाधीशांच्या नावाची सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यात कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विजय बिश्नोई आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. चांदूरकर यांचा समावेश आहे.
माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्या.अभय ओक आणि न्या.ऋषिकेश रॉय यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पदांसाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय कॉलेजियमने ही शिफारस केली आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी याही ९ जून रोजी निवृत्त होत आहेत. सर्वोच्च न्यायालयात एकूण न्यायमूर्तींची मंजूर संख्या ३४ असून, सध्या ३१ न्यायमूर्ती कार्यरत आहेत.
देशातील सात विधिज्ञ झाले न्यायाधीश, सचिन देशमुख मुंबई उच्च न्यायालयात
केंद्र सरकारने सोमवारी सात विधिज्ञांची विविध उच्च न्यायालयांत न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. यात एक महिला विधिज्ञाचाही समावेश आहे. घटनात्मक अधिकारानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याशी चर्चा केल्यानंतर सोमवारी या नियुक्तीची अधिसूचना काढली.मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दीपक खोत, अमित सेठ आणि पवनकुमार द्विवेदी यांची न्यायाधीश म्हणून, तर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात रोहित कपूर यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सुभाष उपाध्याय यांची उत्तराखंड, श्रीमती शमिमा जहां यांची गुवाहाटी तर सचिन शिवाजीराव देशमुख यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.