भाजपाच्या 24 नेत्यांना केंद्र सरकारकडून VIP सुरक्षा; 'या' नेत्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 14:27 IST2022-02-16T14:27:03+5:302022-02-16T14:27:49+5:30
VIP Security : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांना निवडणुकीपर्यंत ही सुरक्षा देण्यात आली आहे. निवडणुकीनंतर त्यांच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेतला जाईल.

भाजपाच्या 24 नेत्यांना केंद्र सरकारकडून VIP सुरक्षा; 'या' नेत्यांचा समावेश
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमध्ये कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, निवडणुकीतील धोका लक्षात घेता केंद्र सरकारने जवळपास 24 भाजपा नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा पुरवली आहे. हे नेते पंजाब आणि उत्तर प्रदेशातील आहेत. आता त्यांच्या सुरक्षेत सीआरपीएफ (CRPF) आणि सीआयएसएफचे (CISF) जवान तैनात करण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांना निवडणुकीपर्यंत ही सुरक्षा देण्यात आली आहे. निवडणुकीनंतर त्यांच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेतला जाईल. सुखविंदर सिंग बिंद्रा, परमिंदर सिंग धिंडसा, अवतार सिंग झिरा, निमिषा टी मेहता, सरदार दीदार सिंग भाटी, सरदार कंवर वीर सिंग तोहरा, सरदार गुरप्रीत सिंग भाटी आणि सरदार हरियत कमल हे व्हीआयपी सुरक्षा मिळालेल्या नेत्यांमध्ये प्रमुख आहेत.
दरम्यान, गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमध्ये कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, काही नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
कशी मिळते व्हीआयपी सुरक्षा?
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे व्हीआयपी सुरक्षा प्रदान केली जाते. कारण पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या सुरक्षेशी संबंधित धोका असतो, त्यामुळे काही लोकांना निवडणुकीपर्यंत व्हीआयपी सुरक्षा दिली जाते. व्हीआयपी संरक्षणाखाली सहा श्रेणी आहेत. यामध्ये एक्स (X), व्हाय (Y), व्हाय-प्लस (Y-Plus), झेड (Z), झेड-प्लस (Z-Plus) आणि स्पेशन प्रोटेक्शन ग्रुप (Special Protection Group-SPG) यांचा समावेश आहे. यापैकी, एसपीजी (SPG) केवळ पंतप्रधानांची सुरक्षा प्रदान करते, तर इतर सुरक्षा श्रेणींची सुरक्षा गुप्तचर विभागाच्या इनपुटच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला प्रदान केली जाऊ शकते. प्रत्येक श्रेणीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वेगळी आहे.