आईच्या स्तनपानातून निघालेल्या दुधाने घेतला २२ दिवसाच्या चिमुकलीचा जीव; कारण समजताच कुटुंब हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:52 IST2025-10-29T14:51:46+5:302025-10-29T14:52:14+5:30
२२ दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबाला विश्वास बसला नाही. त्यांनी मुलीला आग्रा येथील खासगी रुग्णालयात नेले

आईच्या स्तनपानातून निघालेल्या दुधाने घेतला २२ दिवसाच्या चिमुकलीचा जीव; कारण समजताच कुटुंब हैराण
हाथरस - उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. ज्याठिकाणी आईकडून स्तनपान करताना २२ दिवसांच्या चिमुकलीचा जीव गेला आहे. झोपेत मुलीला स्तनपान करताना ही दुर्दैवी घटना घडली. दुधामुळे मुलीची तब्येत ढासळली. मुलीला तात्काळ उपचारासाठी हॉस्पिटलला नेले, परंतु तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. या मुलीच्या श्वसन नलिकेत दूध अडकल्याने तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले.
हाथरसच्या गुतहरा गावातील ही घटना आहे. जिथे अतुल कुमार त्यांच्या कुटुंबासह राहतात. अतुल एका मेडिकल स्टोअरचे मालक आहेत. त्यांच्या कुटुंबात पत्नी रितू किर्ती यांच्याशिवाय २ वर्षाची एक मुलगी आहे. २२ दिवसांपूर्वी किर्ती यांनी आग्रा येथील खासगी रुग्णालयात दुसऱ्या मुलीला जन्म दिला. मंगळवारी दुपारी त्यांची मुलगी झोपलेली होती. ती अचानक उठली आणि रडू लागली.
मुलीला भूक लागली असावी यासाठी रितू किर्तीने चिमुकली आराध्याला स्तनपान करणे सुरू केले. त्यावेळी दूध मुलीच्या श्वसन नलिकेत अडकले. ज्यातून तिची तब्येत खराब झाली. मुलीला श्वास घेण्यास त्रास झाल्याने अचानक ती बेशुद्ध झाली. आईसह कुटुंबातील इतर लोकांनी तात्काळ मुलीला घेऊन हॉस्पिटल गाठले. जिथे डॉक्टरांनी तिला तपासले मात्र तोवर तिचा मृत्यू झाला होता. २२ दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबाला विश्वास बसला नाही. त्यांनी मुलीला आग्रा येथील खासगी रुग्णालयात नेले. तिथल्या डॉक्टरांनीही मुलीची तपासणी करून तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोकांना धक्का बसला.
दरम्यान, सामुहिक आरोग्य केंद्रातील प्रभारी डॉक्टर दानवीर सिंह यांनी या घटनेवर भाष्य केले. या मुलीला बेशुद्ध अवस्थेत नातेवाईकांनी रुग्णालयात आणले होते. मात्र तोपर्यंत मुलीचा श्वास पूर्णपणे थांबला होता. प्राथमिक तपास केला तेव्हा मुलीच्या श्वसन नलिकेत दूध अडकल्याने तिचा जीव गुदमरल्याचे आढळून आले असं डॉक्टरांनी सांगितले.