नवी दिल्ली - हरियाणातील सोनीपतमध्ये 1996 साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने 'लष्कर- ए- तोयबा'चा दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने टुंडाला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.सोनीपतमध्ये 28 सप्टेंबर 1996 रोजी दोन बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटांत 12 जण जखमी झाले होते. या घातपातामागे अब्दुल करीम टुंडाचा हात असल्याचे समोर आले. याप्रकरणी सोनीपतमधील न्यायालयाने टुंडाला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
नवी दिल्ली पोलिसांनी टुंडाला 2013मध्ये नेपाळ बॉर्डरवरुन अटक केली होती. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान टुंडानं कोर्टात सांगितले होते की, बॉम्बस्फोटाच्या वेळी तो पाकिस्तानात होता. 28 सप्टेंबर 1996 साली संध्याकाळी पहिला बॉम्बस्फोट बस स्टँडजवळील तराना सिनेमागृहावर करण्यात आला. यानंतर बरोबर 10 मिनिटांनी दुसरा बॉम्बस्फोट गीता भवन चौकातील गुलशन मिष्ठान्न भांडारजवळ झाला होता. या बॉम्बस्फोटात जवळपास 12 जण जखमी झाले होते.
कसं पडलं नाव टुंडा ?1985 साली अब्दुल करीम टुंडा राजस्थानच्या टोंक परिसरात होता. यादरम्यान, येथे उपस्थित असलेल्या लोकांना तो पाईप गन चालवून दाखवत होता. यावेळी, अपघात होऊन त्याचा हात कापला गेला. यानंतर त्याचे नाव टुंडा असे पडले.