लय भारी! प्रेम विवाहानंतर नशीब फळफळलं, गावकऱ्यांनी थेट सरपंचच केलं; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:40 IST2022-06-18T15:34:00+5:302022-06-18T15:40:51+5:30
प्रेमविवाहामुळे एका महिलेचं नशीब बदललं आणि अवघ्या 21 व्या वर्षी ती गावची सरपंच झाल्याची घटना समोर आली आहे.

लय भारी! प्रेम विवाहानंतर नशीब फळफळलं, गावकऱ्यांनी थेट सरपंचच केलं; नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली - प्रेमाचे अनेक किस्से हे सातत्याने समोर येत असतात. प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. कुटुंबीयांचा विरोध पत्करून लग्न करतात. अनेकदा प्रेमविवाहामुळे धक्कादायक घटना घडतात. असं असताना एक अजब घटना पाहायला मिळाली आहे. प्रेमविवाहामुळे एका महिलेचं नशीब बदललं आणि अवघ्या 21 व्या वर्षी ती गावची सरपंच झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात नाहरमऊ नावाचं एक गाव आहे. या गावातील 21 वर्षीय महिला जानकी गोंड हिची ग्रामस्थांनी सरपंचपदी बिनविरोध निवड केली आहे.
जानकीची सरपंच म्हणून निवड करण्यामागे एक रंजक कथा आहे. चार वर्षांपूर्वी तिचा नाहरमऊ येथील गौरव पटेल याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. सुखी संसार सुरू होता. पण याच दरम्यान ती कधीतरी गावची सरपंच होईल असा विचार देखील तिने कधी केला नव्हता. पण अचानक चमत्कार झाला आणि हे सर्व घडलं. नाहरमऊ ग्रामपंचायत ही अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव होती. यानंतर गावात सरपंचपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. तेव्हा फक्त जानकीच होती.
जानकीला गावकरी आणि कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले आणि तिला बिनविरोध सरपंच करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. विशेष म्हणजे आता आदिवासी विकास ब्लॉक केसली येथील नाहरमऊ ग्रामपंचायतीचा समावेश राज्यातील समरस पंचायतींमध्ये होणार आहे. येथे जानकी सरपंच व 16 पंचही बिनविरोध निवडून आले आहेत. जानकीला जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच होण्याची संधी मिळाली आहे.
जानकीनमे दिलेल्या माहितीनुसार, "आता प्राधान्यक्रम बदलला आहे. पूर्वी मी घरातच होती, पण आता कुटुंब खूप मोठे झाले आहे. गावातील प्रत्येक समस्या मी गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढेन. सर्वात महत्त्वाच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाईल. मी स्वतः फक्त दहावीपर्यंत शिकले आहे. आपली पुढची पिढी शिक्षित होऊन पुढे गेली पाहिजे. येथे पोलीस चौकी सुरू व्हावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक घरात पाणी, स्वच्छतागृहे, घरांची व्यवस्था, चांगल्या रस्त्यांची व्यवस्था याकडे मी विशेष लक्ष देईन." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.