भाजपाला आणखी एक धक्का ?, आता 'हा' मित्रपक्ष साथ सोडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 04:04 PM2018-08-26T16:04:47+5:302018-08-26T16:05:23+5:30

भाजपानं पुन्हा सत्तेत येण्यासाठी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

2019 lok sabha polls bjp ally rlsp leader upendra kushwaha hints at pact with rjd | भाजपाला आणखी एक धक्का ?, आता 'हा' मित्रपक्ष साथ सोडण्याची शक्यता

भाजपाला आणखी एक धक्का ?, आता 'हा' मित्रपक्ष साथ सोडण्याची शक्यता

Next

पाटणा- भाजपानं पुन्हा सत्तेत येण्यासाठी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे मित्र पक्ष त्यांची साथ सोडत आहेत. एनडीएचा घटक पक्ष आणि मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टी(आरएलएसपी)चे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीच्या नेतृत्वातील महागठबंधनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. कुशवाह यांनी भर सभेत तशा प्रकारचे संकेत दिले आहेत. शनिवारी पाटण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कुशवाह म्हणाले, स्वादिष्ट खीर ही यादवांचं दूध आणि कुशवाह लोकांनी पिकवलेल्या भातानंच होऊ शकते.

यादवांकडे प्रामुख्यानं दूध उत्पादक म्हणून पाहिलं जातं. बिहारमध्ये लालूप्रसाद यादवांचा पक्ष आरजेडींकडे यादवांचं प्राबल्य आहे. उपेंद्र कुशवाह हे स्वतः कुशवाह समाजातून आलेले आहेत. कुशवाह समाजाचं प्रमुख उदरनिर्वाहाचं साधन हे भात पिकवणं आहे. त्यामुळे कुशवाह यांनी केलेल्या खिरीचा संदर्भ लालूप्रसाद यांचा पक्ष आरजेडीकडे असल्याचाही काहींचा कयास आहे. येत्या काही दिवसांत कुशवाह महागठबंधनचाही भाग होण्याचा अंदाज वर्तवला जाऊ लागला आहे.

पाटणाच्या श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये मंडल आयोगाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री बी. पी. मंडल यांच्या 100व्या जयंती कार्यक्रमात उपेंद्र कुशवाह यांनी यादव आणि कुशवाह समाजातील लोकांचं कौतुक केलं. तसेच त्यांनी इतर मागासवर्गीय जातीच्या लोकांनाही सोबत घेण्याची भूमिका मांडली. यदूवंशी लोकांचा प्रमुख व्यवसाय हा दूध उत्पादनाचा आहे. कुशवाह समाजानं पिकवलेल्या तांदळातून स्वादिष्ट खीर तयार होऊ शकते. यासाठी आपल्याला अनुसूचित जाती-जमातीतील लोकांनाही सोबत घ्यावं लागेल, असा सूचक इशारा उपेंद्र कुशवाह यांनी दिला आहे.

दुसरीकडे केंद्रीय मंत्री कुशवाह गेल्या काही दिवसांपासून एनडीएमध्ये नाराज आहेत. बिहारमध्ये एनडीएचे सहयोगी असलेले नितीश कुमार आणि कुशवाह यांचं फार काही सख्य नाही. ते दोघेही एकमेकांवर टीका करत असतात. त्यातच कुशवाह यांना महागठबंधनमध्ये सहभागी होण्याचं बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खुलं निमंत्रण दिलं आहे.  

Web Title: 2019 lok sabha polls bjp ally rlsp leader upendra kushwaha hints at pact with rjd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.