बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेलीतील घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले. ही संयुक्त कारवाई उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स, दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि हरियाणा स्पेशल टास्क फोर्स यांनी संयुक्तपणे केली. या कारवाईनंतर दिशाचे वडील जगदीश पटानी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, "इतक्या कमी वेळेत कठोर पावले उचलून गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत."
ही घटना १२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:४५ वाजता घडली. बरेलीतील दिशाच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबाराच्या वेळी दिशा पटानीचे वडील, आई आणि बहिण घरात उपस्थित होते. सुदैवाने, या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. या प्रकरणी बरेली कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एन्काउंटरनंतर प्रतिक्रिया देताना जगदीश पटानी म्हणाले की, "उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस प्रशासन भयमुक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने प्रभावीपणे काम करत आहे." तसेच, त्यांनी दिशाच्या बहिणी खुशबू पटानीच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे निर्माण झालेल्या वादावरही स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, "आम्ही सनातनी हिंदू आहोत आणि सर्व धर्मांचा सन्मान करतो. साधू-संत आमच्यासाठी आदरणीय आहेत. जर कुणी खुशबूची पोस्ट एडिट करून ती चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर आणली असेल, तर तो सोशल मीडियाचा गैरवापर आहे.आम्ही असे कधीही करू शकत नाही."