तुमच्या खिशात येणार २ लाख कोटी, जीएसटी २.० सुधारणांचा फायदा सर्वांना; टॅरिफचा फटका होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 08:09 IST2025-09-23T08:08:53+5:302025-09-23T08:09:24+5:30
नागरिकांनी खरेदीसाठी केली मोठी गर्दी; नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वाहन विक्रीत जबरदस्त उसळी; नागरिकांची खरेदीची ताकद वाढल्याने अर्थव्यवस्थेला येणार गती

तुमच्या खिशात येणार २ लाख कोटी, जीएसटी २.० सुधारणांचा फायदा सर्वांना; टॅरिफचा फटका होणार कमी
नवी दिल्ली : भारतातील ग्राहकांसाठी मोठा दिलासा देत जीएसटी २.० सुधारणा सोमवारपासून लागू झाली. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्याप्रमाणे या निर्णयामुळे १२ टक्क्यांच्या कर स्लॅबमधील ९० टक्क्यांहून अधिक वस्तू आता ५ टक्के स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची तब्बल २ लाख कोटी रुपयांची कर बचत होणार असून, हा पैसा लोकांच्या खिशात खुळखुळणार आहे. त्यामुळे जीएसटी कपातीच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
जीएसटी सुधारणेचा थेट परिणाम घरगुती खर्चावर दिसून येत आहे. अमूलने ७०० उत्पादनांचे दर कमी केले असून, तूप प्रति लिटर ४० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मदर डेअरीने दुधाचे दर २ रुपयांनी कमी केले आहेत. औषधे आणि जीवन व आरोग्य विमा प्रीमियमवरील १८ टक्के जीएसटी हटवण्यात आला आहे.
फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही यांसारखी गृहाेपयोगी उपकरणे ८ ते १० टक्क्यांनी, तर कार ८ ते ९ टक्क्यांनी व दुचाकी ६ ते ७ टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. सणासुदीच्या काळात या करकपातीमुळे खरेदीला मोठी चालना मिळेल, असा उद्योगक्षेत्राचा अंदाज आहे.
लोकांची क्रयशक्ती वाढणार
ग्राहक खर्चाचे भारताच्या जीडीपीतील योगदान सुमारे ६० टक्के आहे. करकपातीमुळे महागाईचा दबाव कमी होऊन देशांतर्गत मागणी वाढेल आणि स्वदेशी उत्पादनाला बळ मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सणासुदीच्या हंगामात ही सवलत मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील खरेदीशक्ती वाढवून अर्थव्यवस्थेला नवी गती देईल.
टॅरिफचा परिणाम कमी होईल : मूडीज
मूडीजच्या मते, अमेरिकेच्या वाढलेल्या शुल्कांचा आणि जागतिक आव्हानांचा निर्यातीत होणारा परिणाम कमी जीएसटी दरांमुळे कमी होईल. तसेच, देशांतर्गत खप वाढेल.
लोकांची सुमारे २.५ लाख कोटी रुपयांची बचत होईल. त्यामुळे घर बांधणे, गाडी खरेदी करणे, उपकरणे घेणे, बाहेर जेवण किंवा सहलीसारख्या इच्छा पूर्ण करणे सोपे होईल. स्वदेशी उत्पादनांना पाठिंबा द्यावा. आपण जे खरेदी करतो ते स्वदेशी, आपण जे विकतो तेही स्वदेशी असावे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान