"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:22 IST2025-09-11T14:18:54+5:302025-09-11T14:22:23+5:30
तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे कसे जगायचे हे शिकवले. कुठल्याही परिस्थितीत हिंमत न हरता त्याला तोंड द्यायला शिकवले असं त्यांनी सांगितले.

"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
नाहन - हिमाचल प्रदेशच्या सिरमौर येथे २ भावांनी एकाच मुलीसोबत लग्न केले होते. आता या २ भावंडांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या भावांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. या भावंडांच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंब आणि गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावात २ भावांनी एकाच मुलीसोबत जुलै महिन्यात लग्न केले होते. सुनीता नावाच्या युवतीसोबत एकत्र संसार थाटला. या लग्नाची देशभरात चर्चा झाली. त्यानंतर हिमाचल प्रदेशातील एका प्रथेबाबत लोकांना कळले. आता या भावंडांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे. या भावांनी वडिलांना फोटो शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलंय की, पप्पा, तुमच्या जाण्यानंतर आता पहिल्यासारखं आयुष्य राहिले नाही. तुम्ही केवळ आमचे वडील नव्हता तर आमची ताकद, आमचा आधार आणि आमचे जग होता. आजही जेव्हा कठीण प्रसंग येतो, तेव्हा तुमच्या आठवणीने हिंमत मिळते. तुमच्या विना घरात एकटेपणा वाटतो. तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे कसे जगायचे हे शिकवले. कुठल्याही परिस्थितीत हिंमत न हरता त्याला तोंड द्यायला शिकवले असं त्यांनी सांगितले.
तसेच आजही तुमच्या प्रत्येक गोष्टी आयुष्यात मार्ग दाखवण्याचे काम करतात. तुम्ही निघून गेलात परंतु तुमचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी आहे. आम्हाला ठाऊक आहे तुम्ही वरून आम्हाला पाहत असाल. आमच्या प्रत्येक सुखात तुम्ही सोबत आहात. तुम्ही आमच्या प्रत्येक श्वासात आहात. मिस यू पप्पा असंही या भावांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे. या दोन्ही भावांचे वडील दीर्घ काळापासून कॅन्सर आजाराने ग्रस्त होते. अलीकडेच त्यांचे निधन झाले आहे.
जुलैमध्ये झालेल्या लग्नाने मिळाली प्रसिद्धी
प्रदीप नेगी आणि कपिल नेगी या दोन्ही भावांनी जुलै महिन्यात सुनीता नावाच्या एकाच मुलीसोबत लग्न केले होते. या २ भावांनी एकाच मुलीशी लग्न केल्याने देशभरात चर्चेचा विषय बनला. यातील एक भाऊ पाणी पुरवठा खात्यात काम करतो, तर दुसरा परदेशात नोकरीला आहे. हिमाचल प्रदेशातील हाटी समुदायात एकाच मुलीसोबत लग्न करण्याची प्रथा आहे. एका कुटुंबातील ५ भावांनीही एका महिलेसोबत लग्न केले होते. हाटी समुदायात ही प्रथा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. संपत्तीचा वाटप होऊ नये म्हणून ही प्रथा सुरू झाली होती. या प्रथेला पांडवांशीही जोडले जाते. त्यांनीही एका महिलेशी लग्न केले होते.