सुरक्षा दलांशी चकमकीत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांमध्ये ११ महिला नक्षली, मोठा शस्त्रसाठा केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 06:07 IST2025-03-30T06:06:27+5:302025-03-30T06:07:51+5:30

Encounter In Chhattisgarh: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी १८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये ११ महिला नक्षलवादी व २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेला एक नक्षलवादी यांचा समावेश आहे.

18 Naxalites killed in encounter with security forces, 11 female Naxalites among the dead, large cache of weapons seized | सुरक्षा दलांशी चकमकीत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांमध्ये ११ महिला नक्षली, मोठा शस्त्रसाठा केला जप्त

सुरक्षा दलांशी चकमकीत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांमध्ये ११ महिला नक्षली, मोठा शस्त्रसाठा केला जप्त

सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी १८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये ११ महिला नक्षलवादी व २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेला एक नक्षलवादी यांचा समावेश आहे. या चकमकीत त्यावेळी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे तीन, राज्य पोलिसांचा एक असे चार जवान जखमी झाले. केरलपल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात ही चकमक झाली, असे बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.

या भागात शनिवारी काही तास ही चकमक सुरू होती. घटनास्थळी १८ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. केरपलच्या जंगलात नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरजी, राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकांनी शुक्रवारी रात्री या भागाला वेढा दिला आणि नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. शनिवारी सकाळी आठ वाजता नक्षलवादी, सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. त्यावेळी ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी सात जणांची ओळख पटली आहे. त्यातील कुहदामी जगदीश उर्फ बुध्रा या नक्षलवाद्याला पकडण्यासाठी पोलिसांनी २५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. दरभा विभागातील नक्षलवाद्यांच्या  विशेष विभागीय समितीचा सदस्य व सचिव असलेला जगदीश अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांना हवा होता. 

ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून एके-४७ रायफली, सेल्फ-लोडिंग रायफल, ३०३ रायफल, रॉकेट लॉंचर, बॅरल ग्रेनेड लॉंचर आणि दारूगोळा आदी जप्त केले आहे. (वृत्तसंस्था) 

१५ नक्षलवाद्यांची शरणागती
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात शनिवारी १५ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली. ही माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
या नक्षलवाद्यांपैकी सिक्का ऊर्फ भीमा मांडवी हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) या संघटनेचा पदाधिकारी होता. नक्षलवादी विचारसरणीतील फोलपणा लक्षात आल्याने त्यांनी शस्त्रे खाली ठेवून शरणागती पत्करली असे पोलिसांनी सांगितले. 

दंतेवाडात जून २०२० पासून नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक वेगाने राबविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत २९२७ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करून ते मुख्य प्रवाहात सामील झाले.

शांतता, विकास हेच बदल घडवू शकतात : अमित शाह
शस्त्रास्त्रे, हिंसाचाराच्या बळावर कोणताही बदल घडविता येत नाही. शांतता व विकास या दोन गोष्टीच मोठे बदल घडवू शकतात असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये शनिवारी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले. 
हा नक्षलवादावर केलेला आणखी एक प्रहार आहे, असेही शाह यांनी म्हटले आहे. ३१ मार्च २०२६पर्यंत देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ठरविले आहे. त्याचा पुनरुच्चारही केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला.

Web Title: 18 Naxalites killed in encounter with security forces, 11 female Naxalites among the dead, large cache of weapons seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.