18 jnu students selected in total 32 seats for the indian economic services exam conducted by upsc | यूपीएससीच्या आयईएस परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा दबदबा; पटकावल्या 32 पैकी 18 जागा

यूपीएससीच्या आयईएस परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचा दबदबा; पटकावल्या 32 पैकी 18 जागा

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) भारतीय अर्थशास्त्र सेवेसाठी (आयईएस) पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाली आहे. सध्या हिंसाचार आणि आंदोलनामुळे चर्चेत असलेल्या नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या १८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत देदीप्यमान यश मिळवलं आहे. भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत जेएनयूच्या विद्यार्थ्यांचाच बोलबोला पाहायला मिळाला आहे. 

भारतीय अर्थशास्त्र सेवेत देशस्तरावर केवळ ३२ जागा असतात. यातल्या १८ जागा जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी पटकावल्या आहेत. यामुळे जेएनयूतल्या शिक्षणाचा दर्जा इतर विद्यापीठांपेक्षा उत्तम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ५ जानेवारीला जेएनयूमध्ये हिंसाचार झाला. विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली. यावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. 

जेएनयूमध्ये तुकडे तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप भाजपा आणि अभाविपनं केला आहे. तर जेएनयूला सर्वोत्तम विद्यापीठ गौरवणारं सरकार दुटप्पीपणानं वागत असून विद्यापीठाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप डाव्यांनी केला आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनांवर उजव्या संघटना टीका करत असताना दुसऱ्या बाजूला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं आहे. 
 

Web Title: 18 jnu students selected in total 32 seats for the indian economic services exam conducted by upsc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.