कफ सिरपमुळे १८ मुलांचा मृत्यू; कंपनीची चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 08:46 IST2022-12-30T08:45:08+5:302022-12-30T08:46:10+5:30
‘डॉक-१ मॅक्स’ हे औषध प्यायल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

कफ सिरपमुळे १८ मुलांचा मृत्यू; कंपनीची चौकशी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: उझबेकिस्तानमध्ये भारतातील मेरियन बायोटेक या औषध कंपनीच्या खोकल्याच्या औषधाचे (कफ सिरप) सेवन केल्याने १८ मुलांचा कथित मृत्यू झाल्याची चौकशी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने (सीडीएससीओ) सुरू केली आहे.
कंपनीच्या कायदेशीर व्यवहार प्रतिनिधीने गुरुवारी सांगितले की, ‘डॉक-१ मॅक्स’ या औषधाचे उत्पादन तात्पुरते थांबविण्यात आले आहे. दरम्यान, औषध कंपनीच्या तपासणीच्या आधारे पुढील पावले उचलली जातील, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.
‘डॉक-१ मॅक्स’ हे औषध प्यायल्याने १८ मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. उत्तर प्रदेशातील विविध केंद्रीय एजन्सी आणि औषध विभागाच्या पथकाने गुरुवारी औषध कंपनीच्या नोएडास्थित कार्यालयाची तपासणी केली.
सरकारने फुशारकी मारणे थांबवावे आणि या प्रकरणात कठोर कारवाई करावी, असा सल्ला काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिला. तर काँग्रेस पंतप्रधान मोदींबद्दलच्या द्वेषामुळे भारताची आणि उद्योजकांची खिल्ली उडवत आहे, असा आरोप भाजपच्या अमित मालवीय यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"