वंदे मातरमची १५० वर्षे : उत्सव साजरा करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 07:07 IST2025-10-27T07:07:05+5:302025-10-27T07:07:22+5:30
राष्ट्रीय गीत भारताच्या चैतन्यशील, भव्य स्वरूपाचे प्रतिबिंब; ‘मन की बात’मध्ये केले संबोधित

वंदे मातरमची १५० वर्षे : उत्सव साजरा करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी दिल्ली : ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत भारताच्या चैतन्यशील आणि भव्य स्वरूपाचे प्रतिबिंब आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. भावी पिढ्यांसाठी ही मूल्ये पुढे घेऊन जात या गीताचे १५० वे वर्ष संस्मरणीय बनविण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओवरील भाषणात सांगितले की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या आणि १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा गायलेल्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या ३० मिनिटांच्या भाषणात देशाच्या विविध भागात नागरिकांनी हाती घेतलेल्या अनेक अनोख्या उपक्रमांचा उल्लेख केला. छत्तीसगडमधील ‘गार्बेज कैफे’, बंगळुरूमधील तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न यांचा यात समावेश होता.
ओडिशातील कोरापुट येथे कॉफी लागवडीच्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. यामुळे या प्रदेशातील लोकांना फायदा होत आहे, असे पंतप्रधान माेदी यांनी सांगितले.
साेशल मीडियामुळे मिळाला नवीन प्राणवायू
पंतप्रधान म्हणाले, संस्कृती, सोशल मीडियाच्या जगाने संस्कृतला एक नवीन प्राणवायू दिला आहे. बरेच लोक त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे संस्कृत व अन्य विषय शिकवित असतात.
नक्षलवादाच्या उच्चाटनामुळे सणांचा आनंद द्विगुणित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी छठपूजेच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हटले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे आणि नक्षलवादाच्या उच्चाटनामुळे या वर्षीचे सण पूर्वीपेक्षा अधिक उत्साहाने साजरे होत आहेत. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूरचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. एकेकाळी नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागातही आज आनंदाचे दिवे उजळले आहेत.