14 deaths due to drinking poisonous liquor in barabanki uttar pradesh | विषारी दारूने घेतला 14 जणांचा बळी; एकाला अटक, 12 अधिकारी निलंबित
विषारी दारूने घेतला 14 जणांचा बळी; एकाला अटक, 12 अधिकारी निलंबित

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी पप्पू जैयस्वालला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 12 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

बाराबंकी - उत्तर प्रदेशमधील बाराबांकी जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी पप्पू जैयस्वालला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच 12 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री राणीगंज आणि शेजारच्या खेड्यांतील लोकांनी रामनगर भागातील दुकानातून ही दारू विकत घेतली. मंगळवारी पहाटे हे लोक आजारी पडल्यामुळे त्यांना रामनगर येथील आरोग्य केंद्रात दाखल केले गेले. त्यांच्यापैकी किमान 16 जणांना लखनौतील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यावर डायलेसीसचा उपचार सुरू असून, पाच ते सहा जणांना लखनौतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये व बलरामपूरला आणण्यात आले. रुग्णालयांत जे लोक आहेत त्यांना शक्य ती सर्व वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश दिले गेले आहेत. मात्र उपचारादरम्यान विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण आजारी पडल्याने सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. या घटनेला राजकीय कट-कारस्थानाचे अंग आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. 48 तासांत चौकशीचा अहवाल मागवण्यात आला आहे. अबकारी विभागाचे 10 आणि दोन पोलीस अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे, असे कॅबिनेट मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले.

12 अधिकारी निलंबित

बाराबंकी जिल्हा अबकारी अधिकारी शिव नारायण दुबे, अबकारी निरीक्षक रामतीर्थ मौर्य, तीन हेड कॉन्स्टेबल्स आणि अबकारी विभागाचे पाच कॉन्स्टेबल्स तात्काळ निलंबित केले गेले आहेत. पोलीस मंडळ अधिकारी पवन गौतम आणि स्टेशन हाऊस अधिकारी राजेश कुमार सिंह यांनाही कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

आसाममध्ये विषारी दारूमुळे 127 जणांचा मृत्यू

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी विषारी दारू प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विषारी दारू प्यायल्याने अनेकांची अचानक तब्येत बिघडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना 127 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तसेच दारूचे नमूने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. विषारी दारू ही शहराच्या बाहेरून आणली होती. ही दारू उत्पादन शुल्काच्याच काही कर्मचार्‍यांनी आणल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. 

विषारी दारूमुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये 92 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने याआधी तब्बल 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. सहारनपूरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यातील 36 जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. विषारी दारूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहारनपूरच्या 18 लोकांचा उपचारादरम्यान मेरठमध्ये मृत्यू झाला होता. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू असे प्रशासनाने सांगितले आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी छापे मारुन आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून बेकायदा दारू मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली होती.

 


Web Title: 14 deaths due to drinking poisonous liquor in barabanki uttar pradesh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.